वक्तशीरपणात मध्य रेल्वे पिछाडीवर! पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल विभाग आठव्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:52 AM2018-08-16T05:52:53+5:302018-08-16T05:53:17+5:30
देशातील सर्व विभागांतील मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणाची यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. देशातील ६९ विभागांमध्ये मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ५५व्या स्थानी असून, पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागाने आठवा क्रमांक पटकावला आहे.
- महेश चेमटे
मुंबई : देशातील सर्व विभागांतील मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणाची यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. देशातील ६९ विभागांमध्ये मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ५५व्या स्थानी असून, पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागाने आठवा क्रमांक पटकावला आहे.
मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणाचा साप्ताहिक अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येतो. त्यानुसार, रेल्वे बोर्डातून संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वक्तशीरपणांमध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना करण्यात येतात.
सोमवार, ६ आॅगस्ट ते रविवार, १२ आॅगस्ट या काळातील विभागीय साप्ताहिक वक्तशीर क्रमवारीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील केवळ ७०.९३ टक्के मेल-एक्स्प्रेस वेळेवर धावल्या आहेत. यामुळे वक्तशीरपणाच्या क्रमवारीत मध्य रेल्वे ५५व्या स्थानी गेले आहे, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील ९४.९९ टक्के मेल-एक्स्प्रेस वेळेत धावल्या आहेत. यामुळे मुंबई सेंट्रल विभागाने क्रमवारीत आठवा क्रमांक मिळविला आहे.
फाटक उघडे असणे, रेल्वे रुळांवरील अपघात या व अन्य कारणांमुळे मेल-एक्स्प्रेसला विलंब होतो, असे रेल्वे अधिकाºयांचे म्हणणे आहे. कल्याण स्थानकात कसारा आणि कर्जत मार्गावर बहुतांश वेळा लोकल थांबवून मेल-एक्स्प्रेसला प्राधान्य देत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येतात. या अडचणी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने कसारा तिसºया आणि चौथ्या मार्गिकेचे काम त्वरित हाती घेऊन पूर्ण करणे आवश्यक असल्याची मागणी कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत यांनी केली आहे.
‘बुलेट’ नंतर, आधी
ट्रेन वेळेत आणा!
बुलेट ट्रेन चालविण्याचे स्वप्न पाहणाºया रेल्वे प्रशासनाने आधी मेल-एक्स्प्रेस वक्तशीरपणे चालविणे आवश्यक आहे. आठवड्यातून बहुतांश वेळा लोकल फेºया विलंबाने धावतात. विलंबाबाबत रेल्वे प्रशासन केवळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती देते. यामुळे बुलेटचे स्वप्न दाखविणाºया रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्यांसाठी असलेली मेल-एक्स्प्रेस वेळेत चालविण्याबाबत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
- समीर झवेरी, रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते.