मुंबईकरांना स्वस्त पर्याय!

By admin | Published: May 10, 2014 01:12 AM2014-05-10T01:12:50+5:302014-05-10T01:12:50+5:30

दक्षिण मुंबईमध्ये वीजपुरवठा करणार्‍या बेस्टच्या क्षेत्रात टाटा पॉवर या वीज कंपनीला वीज वितरणाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

Mumbai cheaper options! | मुंबईकरांना स्वस्त पर्याय!

मुंबईकरांना स्वस्त पर्याय!

Next

मुंबई : दक्षिण मुंबईमध्ये वीजपुरवठा करणार्‍या बेस्टच्या क्षेत्रात टाटा पॉवर या वीज कंपनीला वीज वितरणाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे सातत्याने होणार्‍या बेस्टच्या महागड्या वीजदरांपासून दक्षिण मुंबईतील ग्राहकांची सुटका होणार असून त्यांना आता टाटा पॉवरची स्वस्त वीज घेता येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत प्रामुख्याने चार वीज कंपन्या विजेचा पुरवठा करतात. मुंबई शहरात बेस्ट विजेचे वितरण करत आहे, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांत टाटा पॉवर, रिलायन्स आणि महावितरण या कंपन्या विजेचे वितरण करत आहेत. उपनगरांत प्रामुख्याने रिलायन्स आणि टाटा पॉवर या दोन वीज कंपन्यांमध्ये स्पर्धा असून रिलायन्सच्या तुलनेत टाटाची वीज स्वस्त आहे. परिणामी, आपसूकच उपनगरांतील रिलायन्सचे ग्राहक स्वस्त विजेसाठी टाटाची निवड करत आहेत. मुंबईच्या उपनगरांतील ग्राहकांसह शहरांतील ग्राहकांना आकर्षित करण्यात टाटाने यापूर्वीच प्रयत्न केले होते. परंतु, बेस्टने टाटा पॉवरच्या या कामात खोडा घातला होता. शिवाय, टाटाला शहरात वीजपुरवठा करण्यास ना-हरकत दाखला देण्यास नकार दर्शवला होता. मात्र, सरतेशेवटी २००९ साली बेस्ट आणि टाटा पॉवरमधील वाद अखेर राज्य वीज नियामक आयोगाच्या दारी दाखल झाला होता. आयोगानेही बेस्टच्या विरोधात निकाल दिला होता. शिवाय, टाटा पॉवरने बेस्टची यंत्रणा वापरून अथवा स्वत:ची वीजयंत्रणा उभारून ग्राहकांना वीज वितरीत करावी, असे स्पष्ट केले होते. मात्र, यावर बेस्टने केंद्रीय वीज लवादाचे दार ठोठावले होते. परंतु, लवादानेही आयोगाचा निर्णय कायम ठेवला. परिणामी, बेस्टने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. शहरात विजेचे वितरण करताना टाटा पॉवरला बेस्टची वीजयंत्रणा वापरता येणार नाही. त्यासाठी बेस्टची परवानगी लागेल. शिवाय, आयोगाला या प्रकरणी निकाल देण्याचा अधिकार नाही, अशा अनेक मुद्यांचा ऊहापोह बेस्टने दाखल केलेल्या याचिकेत केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बेस्टचे सर्वच मुद्दे फेटाळून लावले. शिवाय, ज्या वीज कंपनीकडे वीज वितरणाचा परवाना असेल, अशा कंपनीकडे वीजजोडणी मागितल्यास त्यांना वीजजोडणी देण्याचे बंधन संबंधित कंपनीवर आहे, असे म्हणत टाटाला शहरात वीज वितरणाची परवानगी दिली आहे. दरम्यान, टाटा पॉवर कंपनीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. शिवाय, आता दक्षिण मुंबईतील वीजग्राहकांना त्यांच्या पसंतीची आणि स्वस्त वीज घेता येईल, असे म्हणत येथील ग्राहकांना दिलासा दिला आहे. तसेच ग्राहकांना स्वस्त दरात वीज आणि उत्तम सेवा देण्यात येईल, असा दावादेखील कंपनीने केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mumbai cheaper options!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.