मुंबई-चेन्नई काट्याची आज लढत
By admin | Published: May 10, 2014 12:30 AM2014-05-10T00:30:47+5:302014-05-10T00:30:47+5:30
मुंबई संघ मायदेशात विजयी वाटेवर आला खरा; मात्र रुळावर आलेली ही गाडी धावत ठेवण्यासाठी शुक्रवारी आयपीएल-७मध्ये चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल.
मुंबई : यूएईमध्ये सलग पाच पराभवांना सामोरे जाणारा मुंबई संघ मायदेशात विजयी वाटेवर आला खरा; मात्र रुळावर आलेली ही गाडी धावत ठेवण्यासाठी शुक्रवारी आयपीएल-७मध्ये चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल. चेन्नई आठ सामने जिंकून गुणतालिकेत दुसर्या स्थानावर असल्यामुळे चॅम्पियन्स लीग विजेत्या मुंबईला चेन्नईवर विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मुंबईने किंग्ज इलेव्हन पंजाबपाठोपाठ घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर शानदार विजयाची नोंद करताच ‘प्ले आॅफ’च्या दौडीत स्थान कायम ठेवले. पण, पुढील सामन्यात पराभव झाला, तर जेतेपदाच्या शर्यतीतून मुंबई बाद होऊ शकतो. सुपरकिंग्सला मागच्या सामन्यात पंजाबकडून ४४ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पंजाबचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि विंडीजचा किरोन पोलार्ड यांना लवकर कसे बाद करायचे, याची चिंता चेन्नईला लागली असावी. वानेखेडेच्या खेळपट्टीवर चेंडू सहजपणे बॅटवर येत असल्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांची चिंता वाढू शकते. मुंबईचे फलंदाज अंबाती रायुडू आणि कोरी अँडरसन, तसेच सलामीचा चिदंबरम गौतम यानेदेखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. उद्या जर रोहित शर्मा, केरॉन पोलार्ड, अँडरसन यांना सुरू गवसला तर चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई नक्कीच पहायला मिळणार आहे. चेन्नईने या आधीच्या सामन्यात पराभव केलाच आहे, त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न मुंबई संघ नक्कीच करणार. दुसरीकडे सुपरकिंग्स संघात ब्रेंडन मॅक्यूलम, ड्वेन स्मिथ यांच्याशिवाय सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी हे स्ट्रोक्स खेळण्यात पटाईत असल्याने खेळपट्टीचा लाभ घेतील. गोलंदाजीत उभय संघाचा मारा संतुलित आहे. मुंबईकडून लसिथ मलिंगा याने ९, तर चेन्नईकडून मोहित शर्माने १४ गडी बाद केले आहेत. झहीर खानच्या अनुपस्थितीचा फटका मुंबईला बसेल. त्याची जागा उत्तर प्रदेशचा जलद गोलंदाज प्रवीण कुमार घेईल. मुंबईकडे फिरकीसाठी सहा बळी घेणारा हरभजन, तर चेन्नईकडे ११ बळी घेणारा रवींद्र जडेजा आणि सात गडी बाद करणारा रविचंद्रन आश्विन आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
ड्वेन गतवर्षी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. पण यावर्षी तो चेन्नई सुपरकिंग्जकडून धावांचा पाऊस पाडत आहे. त्याला रोखण्याचे आव्हान मुंबईच्या गोलंदाजां पुढे असणार आहे.
जहिर खानच्या अनुपस्थित गोलंदाजीची मदार मलिंगाकडे असणार आहे. गुरुवारी मुंबई संघाने प्रविण कुमार बरोबर करार केला आहे. या दोघांसह हरभजन सिंहकडे चेन्नईच्या फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.