सीईटीत मुंबईच्या मुलांची बाजी

By Admin | Published: June 2, 2016 03:17 AM2016-06-02T03:17:16+5:302016-06-02T03:17:16+5:30

अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालात मुंबईच्या मुलांनी बाजी मारली आहे.

Mumbai children's bet on CET | सीईटीत मुंबईच्या मुलांची बाजी

सीईटीत मुंबईच्या मुलांची बाजी

googlenewsNext

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या (एमएचटी-सीईटी) बुधवारी लागलेल्या निकालात मुंबईच्या मुलांनी बाजी मारली आहे. पीसीबीमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) २००पैकी २०० गुण मिळवून रिषभ रावत, तर पीसीएममध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) २००पैकी १९९ गुण मिळवून अमन फ्रेमवाला आणि चिन्मय घाणेकर हे दोघेही पहिले आले आहेत.
या परीक्षेस राज्यभरातून एकूण ४ लाख ९ हजार २७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तथापि, १ हजार ५४ परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या या परीक्षेला ३ लाख ९८ हजार ०४३ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २ लाख ६२ हजार १३३ विद्यार्थी, तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी २ लाख ७५ हजार ६२७ विद्यार्थी बसले होते. त्यातील अभियांत्रिकीसाठी १०० टक्के म्हणजेच सर्वच विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी केवळ १६.९७ टक्के म्हणजेच ४६ हजार ७९७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत वैद्यकीय अभ्यासक्रमातून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कारण गेल्यावर्षी ३९ हजार २२८ विद्यार्थी पात्र ठरले होते, त्यात यंदा सुमारे साडेसात हजार विद्यार्थ्यांची भर पडली आहे, अशी माहिती सीईटी कक्षाचे आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी दिली.
........................
यंदा दोन चुकीच्या प्रश्नांमुळे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक-एक गुण मिळाल्याने दोन गुणांची कमाई झाली आहे. त्यामुळे यावर्षी सर्वच्या सर्व म्हणजेच ३ लाख ९८ हजार ०४३ विद्यार्थी औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले आहेत. कारण पीसीबी किंवा पीसीएममध्ये किमान १ गुण मिळवलेला विद्यार्थीही औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी पात्र ठरत असल्याचे चंद्रशेखर ओक यांनी दिली.
-----------------
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांत पहिल्या तीन स्थानांवर मुलांनी झेप घेतली आहे. पीसीबीमध्ये पहिल्या स्थानावर रिषभ रावत, दुसऱ्या स्थानावर आदित्य सबनीस, तर तिसऱ्या स्थानावर मानर्थ चौवाला यांनी सरशी केली. तर पीसीएममध्ये अमन फ्रेमवाला आणि चिन्मय घाणेकर यांनी संयुक्तरित्या प्रथम, तर केशव जनयानी याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
......................
प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी चुरस रंगणार
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी मोठी चुरस होणार आहे. कारण शासकीय महाविद्यालयांतील केवळ २ हजार ८१० जागांसाठी एकूण ४६ हजार ७९७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. शिवाय बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बी.पी.टी.एच., बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमांच्या १० हजारांहून अधिक जागांसाठी हे सर्व विद्यार्थी पात्र राहणार आहेत.
अभियांत्रिकीच्या गेल्यावर्षी असलेल्या १ लाख ५३ हजार ८६७ जागांमध्ये यावर्षी मोठी कपात झाली आहे. त्यामुळे यंदा उपलब्ध असलेल्या केवळ १ लाख ३८ हजार ७४१ जागांसाठी २ लाख ६२ हजार १३३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
................................
प्रमुख शहरांतील निकाल घसरला
राज्यातील वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी केवळ १६.९७ टक्के विद्यार्थी पात्र ठरले. यात सर्वाधिक मराठवाड्यातून २१.६१ टक्के, त्याखालोखाल विदर्भातून २०.९१ टक्के आणि उर्वरित महाराष्ट्राचा निकाल केवळ १३.९९ टक्के लागला आहे.
...................
अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमातील टॉपर्सची नावे
अभियांत्रिकी अभ्यासक्रम
विद्यार्थी, महाविद्यालयाचे नावमिळालेले गुण २०० पैकी
१. अमन फ्रेमवाला, जयहिंद महाविद्यालय, मुंबई१९९
२. चिन्मय घाणेकर, साठ्ये महाविद्यालय, मुंबई१९९
३. केशव जनयानी, पीपल्स एज्युकेशन कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे१९७
४. सिद्धेश गांधी, पीएमसी राजीव गांधी अ‍ॅकॅडमी आॅफ इ लर्निंग कनिष्ठ महाविद्यालय, पुणे १९७
५. अमित शिंदे, प्रताप कॉलेज, अमळनेर १९७
६. रोहित जेठानी, पेस कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे १९६
७. कार्तिक सुरेश, सेंट झेवियर्स कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई१९६
८. आदित्य थोरात, केबीपी महाविद्यालय, ठाणे १९६
९. जैनम शहा, जयहिंद महाविद्यालय, मुंबई१९५
१०. तुषार खांडोर, रॉयल कॉलेज आॅफ आर्ट्स सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स, भार्इंदर १९५
वैद्यकीय अभ्यासक्रम
विद्यार्थी, महाविद्यालयाचे नावमिळालेले गुण २०० पैकी
१. रिषभ रावत, आयईएस एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई२००
२. आदित्य सबनीस, साठ्ये महाविद्यालय, मुंबई१९९
३. मानर्थ चौवाला, आयईएस एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई१९९
४. सृष्टी पाटील, आर्मी पब्लिक स्कूल, पुणे१९९
५. अर्शिया चौधरी, ए.डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालय, पुणे१९९
६. स्वप्निल भगत, ब्लू वेल्स कनिष्ठ महाविद्यालय, नांदेड १९९
७. ध्रुव शेट्टी, आयईएस एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई१९८
८. रौनक पोपट, अल्फा कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य१९८
९. वैभव जगताप, खामगाव कनिष्ठ महाविद्यालय१९८
१०. प्रतीक जोशी, अर्णव कनिष्ठ महाविद्यालय, वैराग१९८

Web Title: Mumbai children's bet on CET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.