मुंबई काँग्रेसमध्ये पुन्हा नाराजीनाट्य

By admin | Published: January 21, 2017 06:00 AM2017-01-21T06:00:00+5:302017-01-21T06:00:00+5:30

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

Mumbai Congress again resigns | मुंबई काँग्रेसमध्ये पुन्हा नाराजीनाट्य

मुंबई काँग्रेसमध्ये पुन्हा नाराजीनाट्य

Next


मुंबई : मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप होत आला आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी निरुपम यांच्या नकारात्मक कार्यपद्धतीमुळे महापालिका निवडणुकीतील उमेदवार निवडीच्या प्रक्रियेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गुरुदास कामत यांनी शुक्रवारी संजय निरुपमांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. सतत डावलण्यात येत असल्याने उमेदवार निवड समितीतून बाहेर पडत असल्याचा मेसेज काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पाठविला आहे.
निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे हा निर्णय घेतला असून, यापुढे तिकिटासाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित जिल्हाध्यक्ष आणि आमदारांशी संपर्क साधावा. मी उमेदवार निवड प्रक्रियेतून बाहेर पडत असल्याचे कामत यांनी आपल्या मेसेजमध्ये म्हटले आहे. निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार निवडीच्या चर्चेसाठी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुदास कामत यांनी या बैठकीवरही बहिष्कार टाकला. बैठकीला संजय निरुपम, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, नसीम खान, चरणजितसिंग सप्रा, अमीन पटेल, अस्लम शेख आदी नेते उपस्थित होते. दरम्यान, कामत यांच्यावर आपण निवडणुकीनंतर बोलू, असे सांगत संजय निरुपम यांनी या विषयावर बोलणे टाळले.
सध्या फक्त भाजपा आणि शिवसेनेविरोधात लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानुसार उमेदवार निवडीसाठी एक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. या प्रक्रियेवर कामतांसह सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली असून, त्यावर सर्वांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. त्यामुळे या प्रक्रियेनुसारच उमेदवार निवडले जातील, असेही निरुपम यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
>विश्वासात न घेतल्याचा आरोप
यापूर्वीही संजय निरुपम यांच्या कार्यशैलीवरून मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अलीकडेच कोकणवासीयांच्या मेळाव्यादरम्यानही कामत यांनी मुंबई काँग्रेसमधील घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती. पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याच्या कामात कोणालाच विश्वासात घेतले जात नसून परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा आरोप केला होता.

Web Title: Mumbai Congress again resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.