Mumbai Cruise Rave Party: हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टीवरून NCB-NCP यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:49 AM2021-10-07T05:49:47+5:302021-10-07T05:50:35+5:30

NCP Allegation on NCB Raid on Drugs Party: भाजप कार्यकर्त्यांच्या कारवाईतील सहभागाच्या आरोपाने खळबळ

Mumbai Cruise Rave Party: NCB-NCP Nawab malik clash over high profile drugs party | Mumbai Cruise Rave Party: हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टीवरून NCB-NCP यांच्यात जुंपली

Mumbai Cruise Rave Party: हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टीवरून NCB-NCP यांच्यात जुंपली

Next

मुंबई : एनसीबीने क्रूझवर केलेली छापेमारी हे कुभांड असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक(NCP Nawab Malik) यांनी बुधवारी खळबळ उडवून दिली. मात्र या आरोपांचा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ इन्कार केला. भाजपनेही राष्ट्रवादीच्या या आरोपाचे खंडन केले.

महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी भाजप खोटी प्रकरणे बाहेर काढत आहे. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन तसेच अरबाझ मर्चंट यांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे जे व्हिडीओ व्हायरल झाले, त्यात भाजप पदाधिकारी असल्याचे उघड झाले आहे. भाजपच्या लोकांसोबत अशा प्रकारची कारवाई कशी केली, याचा खुलासा एनसीबीने करावा, अशी मागणी मलिक यांनी केली. मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एनसीबीच्या छापेमारीनंतर आरोपींच्या अटकेवर व्हिडीओ माध्यमातून प्रसारित झाले.

आर्यन खानसोबत सेल्फी असलेली व्यक्तीच त्याला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जात असून ती व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. आर्यन खानला अटक करणारी व्यक्ती किरण गोसावी असून अरबाझ मर्चंटला अटक करणारा मनीष भानुशाली आहे. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. ही व्यक्ती कोण, हे एनसीबीने स्पष्ट करावे, अशी मागणी मलिक यांनी केली.

आर्यन खानच्या अटकेनंतर मीडियामध्ये काही फोटो प्रदर्शित करण्यात आले. क्रूझवर हे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र, मीडियात जे फोटो व्हायरल झाले, ते प्रांतिक कार्यालयातले आहेत. न्यायालयात या सर्वांचा ऊहापोह होईलच. पण, एनसीबीला किरण गोसावी आणि मनीष भानुशाली कोण आहेत, याचे उत्तर द्यावे लागेल. खासगी लोकांना घेऊन छापा टाकण्याचा एनसीबीला अधिकार आहे का, असेही मलिक यांनी विचारले.

सध्या किरण गोसावी आणि भानुशाली यांची फेसबुक प्रोफाइल लॉक आहे. पण, भानुशालीचे ठावठिकाणे आम्ही शोधून काढल्याचे सांगून मलिक म्हणाले, २१ आणि २२ सप्टेंबर रोजी भानुशाली हा गुजरातमधील काही मंत्र्यांना भेटला होता. २१ सप्टेंबर रोजीच अदानी पोर्टवर अफगाणिस्तान येथून आलेले हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले होते. २८ तारखेला पुन्हा एकदा भानुशाली गुजरातमधील मंत्रालयात जाऊन राणा नावाच्या मंत्र्याला भेटला होता. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत कारवाई झाल्यानंतर त्याच कारवाईत भानुशाली कसा काय उपस्थित झाला? भानुशालीचा गुजरातमधील अदानी बंदरावर सापडलेल्या ड्रग्जचा काय संबंध आहे? तसेच भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष कसा? याची उत्तरे एनसीबी आणि भाजपने दिली पाहिजेत, अशी मागणी मलिक यांनी केली.

मलिक यांच्या पोटात का दुखते हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या दुखऱ्या नसवर मी बोट का ठेवू. ड्रग्ज होते की नाही, पार्टी होती की नाही हे पाहण्याऐवजी, हा होता की तो होता हे मलिक सांगत आहेत. त्यांच्या जखमेवरची खपली मला काढायची नाही. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

आर्यन खानला अटक करणारी व्यक्ती के.पी. गोसावी असून अरबाझ मर्चंटला अटक करणारा मनीष भानुशाली आहे. भानुशाली भाजपचा उपाध्यक्ष आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा व इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. ही व्यक्ती कोण, हे एनसीबीने स्पष्ट करावे. - नवाब मलिक, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Mumbai Cruise Rave Party: NCB-NCP Nawab malik clash over high profile drugs party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.