स्वतंत्र शहर आपत्ती व्यवस्थापन पथक असणारं मुंबई देशातील पहिलं शहर

By admin | Published: March 14, 2017 08:17 PM2017-03-14T20:17:41+5:302017-03-14T20:33:07+5:30

आपत्तीकाळात मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकावर (एनडीआरएफ) अवलंबून असणाऱ्या मुंबईला लवकरच एक स्वतंत्र कुमुक मिळणार

Mumbai is the first city in the country to be an independent city disaster management team | स्वतंत्र शहर आपत्ती व्यवस्थापन पथक असणारं मुंबई देशातील पहिलं शहर

स्वतंत्र शहर आपत्ती व्यवस्थापन पथक असणारं मुंबई देशातील पहिलं शहर

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - आपत्तीकाळात मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकावर (एनडीआरएफ) अवलंबून असणाऱ्या मुंबईला लवकरच एक स्वतंत्र कुमुक मिळणार आहे. भूकंप, पूर, इमारत कोसळणे अशा आपत्ती काळात हे पथकच मदतीसाठी धावून येणार आहे. यामुळे सुरुवातीच्या गोल्डन आवार्समध्येच शहर आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत मदतकार्य पोहचवून जीवितहानी रोखणे शक्य होणार आहे. संपूर्ण देशात शहरासाठी विशेष पथक असलेले मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे.

आपत्तीकाळात मदतीसाठी एनडीआरएफची स्थापना झाली. या पथकाला दरवर्षी पावसाळ्यात चार महिन्याकरिता पाचारण करण्यात येते. मात्र त्यानंतर कोणतीही आपत्ती ओढवल्यास हे पथक मुंबईत पोहचेपर्यंत विलंब होतो. परिणामी जीवित व वित्त हानी वाढते. भौगोलिक परिस्थिती आणि मर्यादा लक्षात घेत 'एनडीआरएफ' चे जवान प्रत्येक आपत्तीच्या वेळी तात्काळ पोहोचण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे मुंबई शहराची लोकसंख्या आणि संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन पथक उभारण्यास आयुक्त अजोय मेहता यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.

यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना ....
मुंबई शहर हे अनेक प्रकारच्या आपत्तींसाठी संवेदनशील मानले जाते. यासाठी १९९९ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले. या कक्षाने विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमध्ये महत्वाची कामगिरी बजावली आहे. हा कक्ष आता अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या दृष्टीने आणि कोणत्याही आपत्तीदरम्यान तात्काळ व गुणवत्तापूर्ण आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने 'शहर आपत्ती व्यवस्थापन पथक' अर्थात 'सीडीआरएफ' ची स्थापना करण्यात येणार आहे.

असे असेल पथक ...
पालिकेच्या सुरक्षा दलात गेल्यावर्षी भर्ती झालेल्या दोनशे जवानांचा या पथकामध्ये समावेश करण्यात येणार आहे. या सर्व जवानांना केंद्र सरकारच्या अखत्यारितील 'एनडीआरएफ' द्वारे तसेच भारतीय सैन्य दलाद्वारे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये रासायनिक, जैविक, अणु नैसर्गिक व आण्विक आपत्ती, वैद्यकीय प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण, कोसळलेल्या बांधकामात अडकलेल्या लोकांची सुटका करणे, पुराच्या पाण्यातून लोकांना वाचविणे, उंच इमारतींमधील आपत्ती प्रसंगी लोकांचा बचाव करणे यासारख्या बाबींचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर भूकंप काळात मदत व पुनर्वसन करणे याबरोबर विविध नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीतकार्याचेही या जवानांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आणि जवान वेळेत पोहचतील ....
आपत्कालीन व्यवस्थापनासाठी असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर कसा करावा? याचे प्रशिक्षण या जवानांना दिले जाणार आहे. या जवानांची महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागवार नेमणूक करण्यात येणार आहे. जेणेकरुन भविष्यातील संभाव्य आपत्तीच्या वेळी हे जवान आपत्कालिन परिस्थितीच्या ठिकाणी तात्काळ पोहचतील.

स्वतंत्र पथकाबरोबरच अद्ययावत यंत्र..
आपत्ती व्यवस्थापन पथकासाठी अत्यावश्यक अत्याधुनिक यंत्रसामुग्री देखील घेण्यात येणार आहे. यामध्ये पोर्टेबल ब्रीदिंग उपकरण, पडलेल्या भिंती- खांब इत्यादी उचलण्यासाठी इनफ्लेटेबल टॉवर, एअरलिफ्टींग बॅग, पाणी बाहेर फेकणारे तरंगते पंप, आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी दृकश्राव्य सुविधा असणारे अत्याधुनिक व्हिक्टीम लोकेटर, एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये कुणी व्यक्ती जिवंत आहे का? याचा शोध घेणारे अत्याधुनिक लाईफ डिटेक्टर यंत्र, पाणबुड्यासाठीचा संच, पाण्याखाली संवाद साधण्याचे यंत्र यासारख्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा समावेश असणार आहे.

पालिकेवर आर्थिक भार नाही ...
आपत्कालीन परिस्थितीच्या काळात शहर आपत्ती व्यवस्थापन पथकामध्ये कार्यरत असणारे दोनशे जवान हे पालिकेच्या सुरक्षा खात्याचेच कर्मचारी असल्याने महापालिकेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही. असे पथक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Web Title: Mumbai is the first city in the country to be an independent city disaster management team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.