सामूहिक बलात्काराच्या किंकाळीने हादरतेय मुंबई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2017 01:34 AM2017-05-13T01:34:10+5:302017-05-13T01:34:10+5:30
दर महिन्याला सामूहिक बलात्काराच्या किंकाळीने मुंबई हादरत असल्याची चिंताजनक बाब वर्षभराच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दर महिन्याला सामूहिक बलात्काराच्या किंकाळीने मुंबई हादरत असल्याची चिंताजनक बाब वर्षभराच्या आकडेवारीतून समोर आली आहे. मुंबईत १ एप्रिल २०१६ ते ३० मार्च २०१७पर्यंत सामूहिक बलात्काराचे तब्बल ११ गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेमुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षेचे आव्हान कायम असल्याचे दिसून येत आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवूनही बलात्कार, छेडछाड, अश्लिल वर्तन, विनयभंग आणि हुंड्यासाठी छळ असे महिलांवर होणारे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालल्याचे विदारक वास्तव पोलिसांकडे दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीतून समोर येत आहे.
मुंबई शहर हे महिला आणि मुलींसाठी सुरक्षित असल्याचा दावा नेहमीच पोलिसांकडून करण्यात येतो. वास्तव मात्र वेगळेच असून शहरातील तब्बल ३३ टक्के महिलांना मुंबई असुरक्षित वाटत आहे. ही धक्कादायक माहिती एका स्वयंसेवी सस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाली होती.
धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यांत सामूहिक बलात्काराच्या घटनाही डोके वर काढत आहेत. २०१३मध्ये शक्ती मिल बलात्कार प्रकरणाने सर्वांनाच सुन्न केले. तपास यंत्रणांवर दबाब आणल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना शिक्षाही ठोठाविण्यात आली.
तरीदेखील मुंबईसारख्या मेट्रो सिटीत दर महिन्याला अल्पवयीन मुलींसह एक महिला सामूहिक बलात्काराची शिकार ठरत आहे. १ एप्रिल २०१६ ते ३० मार्च २०१७पर्यंत सामूहिक बलात्कार प्रकरणाचे तब्बल ११ गुन्हे मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये पश्चिम उपनगरातील ८ घटनांचा समावेश आहे.
ओशिवारा (२), दहिसर, ट्रॉम्बे, पवई, जोगेश्वरी, एमएचबी, दिंडोशी, अंबोली, वाकोला, पायधुनी पोलीस आदी पोलीस ठाण्यांत या घटनांची नोंद करण्यात आली आहे. या घटनांमुळे आजही मुंबई पोलिसांसमोर महिलांच्या सुरक्षेचे आव्हान कायम असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.