मुंबईला मिळणार ‘सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी’

By Admin | Published: April 10, 2017 06:41 AM2017-04-10T06:41:33+5:302017-04-10T06:41:33+5:30

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेले मेट्रो-२, मेट्रो-२ ब, मेट्रो-४, मेट्रो-६ आणि मेट्रो-७ अ हे

Mumbai to get 'Superfast connectivity' | मुंबईला मिळणार ‘सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी’

मुंबईला मिळणार ‘सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी’

googlenewsNext

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेले मेट्रो-२, मेट्रो-२ ब, मेट्रो-४, मेट्रो-६ आणि मेट्रो-७ अ हे मेट्रो प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांची कनेक्टिव्हिटी वाढवणार आहेत. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. एमएमआरडीएचे मेट्रो प्रकल्प मार्गी लागण्यास अवकाश असला, तरी भुयारी मेट्रो-३ हीदेखील या मार्गांना जोडणार आहे. मुंबई शहरदेखील पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, केवळ पूर्व आणि पश्चिम उपनगर नाही, तर ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेशाची कनेक्टिव्हिटी मेट्रोसारख्या वाहतूक प्रकल्पांमुळे वाढण्यास मदत होणार आहे. यातील बहुतांश प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगर जोडण्यावर भर देत आहेत. एकंदर प्राधिकरणाने या प्रकल्पांसाठी केलेली तरतूद पाहता, भविष्यात या प्रकल्पांमुळे उपनगर ‘सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी’कडे वाटचाल करणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुलाच्या विकासाकरिता ७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे संकुलात अधिक पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध होणार आहेत. संकुलामध्ये नेहमी येणाऱ्या-जाणाऱ्यांबरोबरच क्वचित भेट देणाऱ्यांकरिता विद्युत/हायब्रीड बसची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, वांद्रे-कुर्ला संकुलाचे रूपांतर ‘स्मार्ट सिटी’मध्ये करण्याकरिता ही दीर्घकालीन तरतूद करण्यात आली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला पुलापर्यंत उन्नत मार्ग बांधण्याकरिता ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून, पाच किलोमीटर लांबीच्या उन्नत वाकोला-कुर्ला मार्गामुळे वांद्रे-कुर्ला संकुलास उत्तम जोडणी उपलब्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे, येथील वाहतूककोंडीची समस्या कमी होईल. (प्रतिनिधी)

पहिला मेट्रो मार्ग
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा पहिला मेट्रो मार्ग उभारला. या मेट्रोला झालेल्या विलंबामुळे प्राधिकरणावर कठोर टीका झाली. मेट्रोच्या उद्घाटनापासून मेट्रोच्या कामकाजामुळे ही मेट्रो सुरुवातीपासून वादात सापडली. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर मेट्रो धावू लागली, तेव्हा मात्र प्रवाशांनी या मार्गाला तुफान प्रतिसाद दिला.

छेडानगर फ्लायओव्हर ठरणार उपयुक्त
पूर्व उपनगराचा विचार करता, छेडानगर येथे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडपासून आणि पूर्व द्रुतगती महामार्गापासून येणारी वाहने एकाच ठिकाणी येतात. परिणामी, वाहतूककोंडीत भर पडते. वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी दोन फ्लायओव्हर आणि एक उन्नत रस्ता बांधण्याकरिता २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
हा ८० मीटर लांब आणि तीन मार्गिका असणारा फ्लायओव्हर, सध्या अस्तित्वात असणाऱ्या तीन मार्गिकेच्या फ्लायओव्हरशी संमातर असून, तो सायन ते ठाण्याच्या दिशेने जाईल. तर १ हजार २४० मीटर लांब आणि दोन मार्गिकांचा असणारा दुसरा फ्लायओव्हर हा छेडानगर येथे अस्तित्वात असलेल्या फ्लायओव्हरवरून जाईल.
नवी मुंबईपासून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीला या फ्लायओव्हरचा वापर करणे शक्य होईल. शिवाय, ६५० मीटर लांब आणि दोन मार्गिका असणारा उन्नत रस्ता छेडानगर येथील सध्याच्या फ्लायओव्हरला अमर महल जंक्शन फ्लायओव्हरशी जोडला जाणार आहे.याचा खर्च २४९ कोटी एवढा आहे.


मेट्रो-९
दहिसर पूर्व ते मीरा-भार्इंदर या मेट्रो-९ या मेट्रो मार्गालाही मान्यता मिळाली आहे. या मेट्रो मार्गात १० स्थानके असणार आहेत. या प्रकल्पाकरिता आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादनासाठी होणारा खर्च ६ हजार ५१८ कोटी एवढा आहे.

मेट्रो-२
दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा मेट्रो-२ मार्ग पश्चिम आणि पूर्व उपनगराला जोडणार आहे. या मार्गामुळे पश्चिम उपनगरातील दहिसरपासून हार्बरवरील मानखुर्द गाठणे सहज शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मार्गात वांद्रे कनेक्ट असल्याने प्रवाशांची पायपीट वाचणार आहे.

मेट्रो-२ ब : डी. एन. नगर-मंडाळे हा मेट्रो-२ ब प्रकल्पही पश्चिम आणि पूर्व उपनगराची कनेक्टिव्हिटी वाढवणार असून, या प्रकल्पाची किंमत दोनशे कोटी आहे.

मेट्रो-४
वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली हा मेट्रो-४ मार्ग संपूर्णत: पूर्व उपनगराची कनेक्टिविटी वाढवणार आहे. या मार्गामुळे ठाणे दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे हार्बर पूर्व उपनगराशी जोडले जाणार आहे. ही कनेक्टिविटी पूर्व उपनगराला दिलासा देणार आहे.

मेट्रो-६
कांजूरमार्ग समर्थनगर-जेव्हीएलआर-सिप्झ-कांजूरमार्ग-विक्रोळी हा मेट्रो-६ मार्ग पूर्व उपनगराला दिलासा देणार आहे. या मार्गामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगर जोडले जाईल.

मेट्रो-७ अ
अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा मेट्रो-७ अ हा प्रकल्प पश्चिम उपनगराची कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. या मेट्रो मार्गामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी कमी होईल, असा विश्वास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.

Web Title: Mumbai to get 'Superfast connectivity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.