मुंबई-गोवा बोटवाहतूक लवकरच सुरू होणार!
By admin | Published: October 5, 2014 09:48 PM2014-10-05T21:48:10+5:302014-10-05T23:07:08+5:30
कोकण किनारपट्टीवरील बंदरांना तब्बल ४० वर्षांनंतर गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील बंदरांना तब्बल ४० वर्षांनंतर गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या दिवाळीनंतर मुंबई-गोवा सागरी बोटवाहतूक सुुरू होणार आहे. कोकण बंदर विकास समितीचे अध्यक्ष आनंद हुले यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. रस्ते वाहतुकीला महत्व येण्याआधी ४० वर्षांपूर्वीच्या काळात कोकण किनारपट्टीवर मुंबई ते गोवा अशी जलमार्ग बोटवाहतूक सुरू होती. त्यावेळी बोटीद्वारे प्रवासी वाहतूकीबरोबरच मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात होती. परिणामी कोकणच्या सागरी किनाऱ्यावरील सर्वंच बंदरे रात्रंदिवस गजबजलेली असायची. या बंदरांच्या भागात असलेल्या गावांचा, शहरांचा मोठा विकास झाला होता. त्यांची अर्थव्यवस्थाही याच बोटवाहतुकीवर चालायची. मात्र, रस्ते वाहतुकीची साधने वाढली. काळाच्या ओघात सागरी बोटवाहतूक बंद झाली. त्यानंतरच्या काळात बोटवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न वारंवार झाले. परंतु त्यात यश आले नाही. मात्र, मुंबई - गोवा बोट वाहतूक सुरू व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोकण बंदर विकास समिती कार्यरत होती. पाठपुरावा सुरू होता. अखेर मुंबई-गोवा जलमार्गावर दिवाळीनंतर बोट वाहतूक सुरू करण्याबाबत महाराष्ट्र विकास मंडळामार्फत पुढाकार घेण्यात आला आहे. सिंगापूरला स्टार क्रुझ बोट सेवा यशस्वीरित्या सुरू आहे. त्याच धर्तीवर दिवाळीनंतर कोकण क्रुझ बोट मुंबई-गोवा जलमार्गावर सुरू होत असून, त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील बंदरे पुन्हा गजबजणार आहेत. किनारपट्टीला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे. दिवाळीला अवघे काही दिवस सुरू राहिले असून, ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)