मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग खचला

By Admin | Published: January 16, 2017 03:03 AM2017-01-16T03:03:48+5:302017-01-16T03:03:48+5:30

मुंबईहून कोकणात, पुढे दक्षिण भारतात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव जवळचा व सोईस्कर मार्ग आहे

The Mumbai-Goa National Highway has collapsed | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग खचला

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग खचला

googlenewsNext

सिकंदर अनवारे,

दासगाव- मुंबईहून कोकणात, पुढे दक्षिण भारतात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव जवळचा व सोईस्कर मार्ग आहे. या मार्गावरून दिवसभर १२ ते १५ हजार वाहने ये-जा करतात. तर हजारो प्रवासी या मार्गावरून दरदिवशी प्रवास करतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग महाड तालुक्यातील केंबुर्ली गावचे हद्दीत, तसेच गांधारपाले गावच्या हद्दीत अवघड वळणावरच एका बाजूने संपूर्ण खचला आहे.
राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून खचलेल्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, महामार्ग दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद नसल्याने गेल्या महिनाभरापासून रस्ता तसाच खचलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या व कोकणातून मुंबईला येणारी हजारो वाहने, तसेच हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. खचलेल्या ठिकाणी गेल्या महिन्याभरात २० ते २५ गाड्या घसरल्याची घटना घडली. मात्र, महामार्ग बांधकाम विभागाकडून याकडे पूर्णत: दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कोकणातील नागरिकांचा येण्या-जाण्याचा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरच दर मिनिटाला १० ते १५ वाहने धावतात, तर दिवसभरात जवळपास १५ हजार वाहने मार्गावर धावत आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याचे आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. सध्या शेतकऱ्यांची जागा भूसंपादित करण्याचे काम वेगात आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील केंबुर्ली गावचे हद्दीत दोन्ही ठिकाणी अवघड वळणावरच एका बाजूने गेल्या महिन्याभरापूर्वी संपूर्ण रस्ता खचून गेला आहे. या दोन्ही वळणावरचा गेल्या दोन ते तीन वर्षांचा अपघाताचा आकडा या मार्गावर झालेल्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अनेक प्रवासी जायबंदी झालेत, तर अनेक प्रवाशांनी याच वळणावर अपघातामध्ये आपले जीव गमावले आहेत. खचलेल्या रस्त्याची महामार्ग बांधकाम विभाग महाड यांच्याकडून पाहणी करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका आहे, असे निष्कर्षही काढण्यात आले; परंतु या ठिकाणी काम करण्यासाठी पैशांची तरतूद नाही, यासाठी या खचलेल्या रस्त्या ठिकाणचे काम होत नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. महिनाभरात या खचलेल्या ठिकाणी २५ ते ३० गाड्या घसरल्या. मात्र, कोणतीच जीवितहानी झाली नाही.
गोवा, कोकण विभागाकडून जवळपास १०० ते १५० आरामदायी बसेस या मार्गावरून रात्रीच्याच वेळी धावतात. सध्या खचलेली दोन्ही ठिकाणे अवघड वळणावरच असल्याने रात्रीच्या या होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी खचलेला रस्ता वाहन चालकांना दिसत नाही. खचलेल्या रस्त्यावर गाडी उतरल्यानंतर वाहनावरील चालकाचा ताबा
सुटतो. त्यामुळे वाहन पलटी होण्याची, घसरण्याची भीती आहे. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय महामार्ग
बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी, चालक
यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
>तीन ठिकाणी अपघातांचा धोका कायम
दासगावमध्ये काही दिवसांपूर्वी रसायनाचा टँकर पलटी झाला होता. त्या टँकरच्या धडकेने महामार्गाचा रस्त्यालगतचा संरक्षण कठडा पार तुटला आहे. महामार्ग बांधकाम खात्याने सरळ सरळ पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी कठडा नसल्याने कधीही गाडी खाली कोसळण्याची भीती आजही कायम आहे. दुसरा केंबुर्ली, तिसरा गांधारपाले रस्ता खचलेल्या ठिकाणी अशा तीन ठिकाणी अपघातांचा धोका कायम असून त्यामुळे चालकांमध्ये नाराजी आहे.
२५-30 गाड्या महिन्याभरात या मार्गावर घसरल्या आहेत. महामार्ग बांधकाम विभागाकडून पाहणीही करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका आहे, असे निष्कर्षही काढण्यात आला असून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
>महामार्ग खचण्याचे प्रमाण जास्त
गेल्या अनेक वर्षांपासून महाड तालुक्यातील अनेक ठिकाणी महामार्ग खचण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या वर्षी दासगाव खिंडीत रस्ता अर्ध्या बाजूने एक एक फूट खचला होता. त्याअगोदर दासगाव खिंडीत झालेले नवीन काम हेही पूर्णपणे खचले होते. त्याच पाठोपाठ केंबुर्ली व गांधारपाले या गावांच्या हद्दीत रस्ता खचला. यामागे कारण एकतर निकृष्ट दर्जाचे काम, दुसरे रस्त्यालगत विनापरवाना होणारे ठेकेदारांकडून खोदकाम या दोनच कारणांमुुळे रस्ता खचल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
दोन ठिकाणी रस्ता खचला असून त्याची पाहणी केली आहे. पूरहानी कार्यक्रमाअंतर्गत त्याची दुरुस्ती करणार आहोत. त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. मात्र, अद्याप निधीची तरतूद झाली नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे.
-प्रकाश गायकवाड, उपअभियंता,
राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाड
संपूर्ण राज्यामध्ये ९ जानेवारीला रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली. वाहन चालकांना महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. महामार्ग वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने दासगांव, कें बुर्ली व गांधारपाले या तीन ठिकाणी अपघातांसाठी निर्माण झालेल्या धोक्यासंदर्भात सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमामध्ये महामार्ग बांधकाम विभाग महाड या अधिकाऱ्यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सुरक्षा महत्त्वाची नाही हे समजून या कार्यक्रमाला महाड विभागाकडून कोणत्याही अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली नाही.
- सुभाष ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक,
महामार्ग वाहतूक शाखा महाड

Web Title: The Mumbai-Goa National Highway has collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.