मुंबई - टोमॅटोला सोन्याचा भाव, दहिसरमधून 900 किलो टोमॅटो चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 10:57 AM2017-07-21T10:57:46+5:302017-07-21T11:05:20+5:30
एकीकडे 100 रुपये किलो भाव झाल्याने टोमॅटो ताटातून गायब होऊ लागला असतानाच चोरांचीही नजर टोमॅटोवर पडलेली दिसत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - पोलीस ठाण्यात एखाद्या व्यक्तीने चोरी झाल्याची तक्रार केली असेल तर ती साहजिकपणे सोने, चांदी किंवा पैशांची असेल असं वाटतं. पण दहिसर पोलीस ठाण्यात चक्क टोमॅटो चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. एकीकडे 100 रुपये किलो भाव झाल्याने टोमॅटो ताटातून गायब होऊ लागला असतानाच चोरांचीही नजर टोमॅटोवर पडलेली दिसत आहे. त्यामुळे सोने, चांदीची चोरी न करता त्यांनी टोमॅटोवर हात साफ केला आहे. दहिसर पोलीस ठाणे हद्दीतील अविनास कंपाऊंडमधील भाजी मार्केटमध्ये ही चोरी झाली आहे. विशेष म्हणजे एक दोन नाही तर तब्बल 900 किलो टोमॅटो चोरीला गेले आहेत.
संबंधित बातम्या
दहिसर पोलीस ठाण्यात 25 हजार किंमतीचे 300 किलो टोमॅटो चोरीला गेल्याची तक्रार दाखल आहे. मात्र तक्रारदार टोमॅटो विक्रेता जगत श्रीवास्तव यांनी एकूण 900 किलो टोमॅटो चोरीला गेल्याचा दावा केला आहे. बाजारभावाप्रमाणे या टोमॅटोंची किंमत 60 हजाराहून जास्त आहे.
जगत श्रीवास्तव यांचे शेजारी रामप्रकाश सिंह यांनी सांगितलं आहे की, "जगत गेल्या 12-13 वर्षांपासून टोमॅटोचा व्यवसाय करत आहे. डोंगरीमध्ये राहणारे जगत दिवसाला 300 रुपये भाड्यावर दुकान चालवतात. चोरांनी इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या बाजारात प्रत्येक कॅरेटमागे दोन हजार रुपये भाव सुरु आहे. वाशी मार्केटमध्ये हा माल नेला जातो. तिथे सर्व व्यवहार उधारीवर असतो. अशा परिस्थितीत, ही चोरी झाल्यामुळे व्यापा-यांना चिंता लागली आहे".
दहिसर पोलीस दबाव टाकत असल्याचा आरोप
पोलीस 900 किलोऐवजी फक्त 300 किलो टोमॅटो चोरी झाल्याची तक्रार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप जगत श्रीवास्तव यांनी केला आहे. यामुळेच आपण 300 किलो टोमॅटो चोरी झाल्याची तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पोलीस हे प्रकरण गंभीरतेने घेत नसून, सीसीटीव्हीत दिसलेल्या साई समर्थ टेम्पोबद्दल माहिती देऊनही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दहिसर पोलिसांनी जगत श्रीवास्तव यांच्या तक्रारीच्या आधारे अज्ञातांविरोधात चोरीची तक्रार नोंद केली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.
टोमॅटोचे घाऊक बाजारांतील दर (प्रति किलो)
१ जून६ ते १४ रुपये
१ जुलै३० ते ४५ रुपये
२ जुलै३० ते ४८ रुपये
३ जुलै३४ ते ४० रुपये
४ जुलै३५ ते ४० रुपये
५ जुलै४० ते ४५ रुपये
६ जुलै४० ते ४५ रुपये
७ जुलै४५ ते ५० रुपये
८ जुलै४५ ते ५० रुपये
९ जुलै५० जे ६० रुपये
१० जुलै४५ ते ५५ रुपये
किरकोळ बाजारांतील टोमॅटोचे दर
कुर्ला१०० ते १२० रुपये
दादर १०० रुपये
मानखुर्द१२० ते १४० रुपये
वरळी१०० ते १२० रुपये
मशीद ८० ते १०० रुपये
बोरीवली१२० रुपये