दुधाची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; मुंबई ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 03:23 PM2018-07-16T15:23:56+5:302018-07-16T15:27:15+5:30
दूध पुरवठा रोखणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी
मुंबई: मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखणाऱ्या आणि आंदोलनादरम्यान दूध फेकून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबईला होणारा दुधाचा पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असं आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी केलं आहे. याशिवाय दूध रस्त्यावर फेकून देणाऱ्या, दुधाच्या टँकर्सना आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीदेखील त्यांनी केली आहे.
दुधासाठी शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि ग्राहकांना मोजावी लागणारी किंमत ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं ठरवण्यासाठी तज्ञांची समिती नेमावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीनं केली असल्याची माहिती अॅड. शिरीष देशपांडे यांनी दिली. दूर दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे. दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांची दरवाढ देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यभरात एल्गार पुकारला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. पहिल्या दिवशी दूध पुरवठ्यावर परिणाम झाला नसला तरी दुसऱ्या दिवशी दुधाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.