केंद्राच्या धर्तीवर मुंबईचा आता एकच अर्थसंकल्प
By admin | Published: January 24, 2017 04:26 AM2017-01-24T04:26:45+5:302017-01-24T04:26:45+5:30
मुंबईत शिवसेनेची पुन्हा सत्ता आली तर बेस्ट या परिवहन सेवेचा वेगळा अर्थसंकल्प न मांडता महापालिकेच्या अर्थसंकल्पातच
मुंबई : मुंबईत शिवसेनेची पुन्हा सत्ता आली तर बेस्ट या परिवहन सेवेचा वेगळा अर्थसंकल्प न मांडता महापालिकेच्या अर्थसंकल्पातच तो समाविष्ट केला जाईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जाहीर केले. केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्प मोडीत काढला त्या धर्तीवर हा निर्णय असल्याने शिवसेनेच्या वचननाम्यावर ‘मोदी’छाप असल्याची चर्चा आहे.
मुंबईच्या परिवहन सेवेसह विकासाच्या विविध कामांचे एकत्रितपणे नियोजन करता यावे म्हणून ही भूमिका आपण घेतली असून, त्यामागे ‘बेस्ट’ची स्वायत्तता संपविण्याचा कुठलाही विचार नाही, असे ठाकरे यांनी सेना भवनातील पत्र परिषदेत सांगितले. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनाही विम्याचे संरक्षण दिले जाईल, रेल्वे स्थानकांपासून दूर राहणाऱ्या नागरिकांसाठी छोट्या आकाराच्या ‘बेस्ट’ बसेस सुरू करण्यात येतील, असे ते म्हणाले.
आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्यास ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शविला. तसे केल्याने मोठा परिसर पावसाळ्यात पाण्याखाली जाईल आणि आज निर्णय करणारे लोकांचे हाल होताना काय करतील, असा सवाल त्यांनी केला.
५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ, ७०० चौ. फुटांवरील सदनिकाधारकांसाठी विशेष योजनेचा त्यांनी पुनरुच्चार केला. (विशेष प्रतिनिधी)
भाजपाच्या बाजारांना शिवसेनेचा पर्याय
पणन विभागामार्फत शेतकरी बाजार ही संकल्पना राबविली जात असून, ती अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हायजॅक केली आहे.
आज शिवसेनेच्या वचननाम्यात राज्यभरातून शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाच्या विक्रीसाठी मुंबईत बाजारांची उभारणी केली जाईल, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आधीच घोषणा
उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलेल्या वचननाम्यातील काही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केल्याचे स्पष्ट दिसते. त्यात बस, मेट्रो, लोकल या सेवांसाठी एकच संयुक्त पासच्या घोषणेचा तसेच कोस्टल रोडचा समावेश आहे.
नागपुरातपण रस्ते खराब
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी, नागपुरातपण रस्ते खराब आहेत, असा चिमटा काढला. मुंबईतील रस्ते कधी चांगले होतील, या प्रश्नात ते खोचकपणे म्हणाले की, ‘अच्छे दिन’ येण्याआधी नक्कीच रस्ते चांगले करू.’