मुंबईची सहा महिन्यांच्या पाण्याची तजवीज झाली
By admin | Published: July 19, 2016 05:20 AM2016-07-19T05:20:49+5:302016-07-19T05:20:49+5:30
जुलैच्या पंधरवड्यातच प्रमुख तलावांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा जमा झाला आहे़ तुळशी तलाव लवकरच भरून वाहण्याचीही शक्यता आहे़
मुंबई : जुलैच्या पंधरवड्यातच प्रमुख तलावांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा जमा झाला आहे़ तुळशी तलाव लवकरच भरून वाहण्याचीही शक्यता आहे़ त्यामुळे गेले वर्षभर सुरू असलेली पाणीकपात रद्द होण्याची चिन्हे आहेत़
काही वर्षांपासून पावसाचा ट्रेंड बदलला आहे़ गेली दोन वर्षे तलाव क्षेत्रात अपुरा पाऊस होत होता़ जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो़ मात्र गेल्या वर्षी जुलै महिना संपूर्ण कोरडा गेला़ त्यामुळे मुंबईत पाणीबाणीची स्थिती निर्माण होऊन आॅगस्ट २०१५ पासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली़ तलावांमध्ये चांगला जलसाठा जमा होईपर्यंत ही कपात मागे न घेण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली़
त्यात जून महिना कोरडा गेल्यामुळे पाणीकपातीमध्ये वाढ होण्याचे संकेत होते़ अखेर जुलै महिन्यात पावसाळी ढग तलावांकडे परतले़ सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलावांची पातळी झपाट्याने वाढली़ त्यामुळे पुढचे सहा महिने तरी पाण्याची काळजी मिटली आहे. पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने ही कपात रद्द करून घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून दबाव वाढत आहे़ तलावांची स्थितीही समाधानकारक असल्याने पाणीकपातीचा टक्का कमी होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)