चंदीगढचे हृदय मुंबईला !
By Admin | Published: June 5, 2017 05:13 AM2017-06-05T05:13:18+5:302017-06-05T05:13:18+5:30
५१ वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि चौथे फुप्फुस प्रत्यारोपणही यशस्वीरीत्या पार पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेने नुकतेच अर्धशतक पूर्ण केले असून त्यानंतर आता ५१ वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि चौथे फुप्फुस प्रत्यारोपणही यशस्वीरीत्या पार पडली आहे. चंदीगढच्या ४० वर्षीय व्यक्तीला ब्रेनडेड घोषित केल्यावर, त्यांच्या पत्नीचे सुमपदेशन केल्यानंतर, कुटुंबीयांच्या परवानगीने अवयवदान करण्यात आले. चंदीगढहून विमानाद्वारे २ तास ३८ मिनिटांत हृदय मुंबईला आणण्यात आले. या दात्याने हृदयासह फुप्फुसे, यकृत, मूत्रपिंड आणि नेत्रदानही केले आहे.
मुलुंड येथील रुग्णालयात पार पडलेल्या या हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेत डोंबिवलीच्या ४३ वर्षीय व्यक्तीस हृदय प्रत्यारोपित करण्यात आले. हा रुग्ण डायलेटेड कार्डिओमायोपथीने ग्रस्त असल्याचे निदान करण्यात आले होते. गेल्या ३७ दिवसांपासून तो रुग्ण हृदयासाठी प्रतीक्षायादीत होता, तर इंदूरच्या ५५ वर्षीय महिला रुग्णास फुप्फुस प्रत्यारोपित करण्यात आले. या रुग्णास अखेरच्या फुप्फुसांचा विकार असून, दोनहून अधिक आठवडे यांचे नाव प्रतीक्षायादीत होते. याबरोबरच दात्याने केलेले नेत्रदान नेत्रपिढीकडे सुपुर्द करण्यात आले आहे, अशी माहिती हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया चमूचे प्रमुख डॉ. अन्वय मुळे यांनी दिली.
चंदीगढ येथील पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथून सकाळी ११ वाजून २ मिनिटांनी तेथील चमू निघाला. त्यानंतर, १ वाजून १५ मिनिटांनी मुंबईला हा चमू पोहोचला. गेल्या काही महिन्यांपासून आईची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यामुळे आम्ही दात्याच्या शोधात होतो. आता मात्र, या फुप्फुस प्रत्यारोपणाने खूप समाधानी आहोत, अशी भावना फुप्फुस प्रत्यारोपित करण्यात आलेल्या रुग्णाच्या मुलीने व्यक्त केली.
दात्याचे हृदय मुंबईत २ तास ३८ मिनिटांत पोहोचले, तसेच दात्याने हृदयासह फुप्फुसे, यकृत, मूत्रपिंड आणि नेत्रदानही केले आहे.