Rain Update: पुढचे ५ दिवस कोसळधारांचे, मराठवाड्यात जोरदार, तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 12:13 PM2023-07-01T12:13:18+5:302023-07-01T12:13:43+5:30
Maharashtra Rain Update: मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचे थैमान सुरू असून, शहराच्या तुलनेत उपनगरात बरसणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचे थैमान सुरू असून, शहराच्या तुलनेत उपनगरात बरसणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे पडझडीच्या घटनाही घडत असून, शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मुंबईत ९० मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली असून, शनिवारीही मुंबईत मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.
यलो अलर्ट
अकोला व वाशिम जिल्ह्यात आर्द्रा नक्षत्रात पाऊस रिपरिप बरसला. त्यानंतर पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून, जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकणला ऑरेंज अलर्ट
■ कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी दमदार पाऊस कोसळेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.