मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांना धमकी; कोर्ट परिसरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 01:32 PM2017-09-13T13:32:48+5:302017-09-13T13:32:48+5:30
मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे.
मुंबई, दि. 13- मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर हायकोर्ट परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दहशतवादविरोधी पथकाला धमकीचा फोन आला होता. मुख्य न्यायमूर्तींच्या चेंबर बाजूच्या रुममध्ये बॉम्ब ठेवला असून थोड्याच वेळात स्फोट घडवला जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनंतर हायकोर्ट परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली. तसंच न्यायमूर्तींच्या दालनात बॉम्ब शोध पथक, श्वान पथक तिथे दाखल झालं. यानंतर दुसऱ्या मजल्यावरील मंजुला चेल्लूर यांच्या कोर्टरुमसह शेजारील खोलीचीही तपासणी केली.
परंतु तपासणीत बॉम्ब किंवा बॉम्बसदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही. मात्र पूर्ण तपासणीनंतर मंजुळा चेल्लूर यांना कोर्टरुममध्ये पाठवलं जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, ही धमकी कोणी दिली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं असल्याचं समजतं आहे.
A courtroom of the Bombay High Court was vacated after a threat call; bomb squad didn't found anything in search; declared hoax
— ANI (@ANI) September 13, 2017
कोण आहेत मंजुळा चेल्लूर?
- 1955 साली कर्नाटकातील बेल्लारी गावात मंजुला चेल्लूर यांचा जन्म
-1977 साली कायदा विषयात पदवी संपादित केली.
- 1978 मध्ये कर्नाटकच्या बेल्लारीमध्ये वकील म्हणून करिअरची सुरुवात केली.
- 1988 मध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केलं.
- 2000 मध्ये कर्नाटकमध्ये पहिल्या महिला न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती.
- मुंबई हायकोर्टाच्या 154 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्या महिला न्यायमूर्ती होण्याचा मान
- याआधी 2014 मध्ये त्यांनी कोलकाता हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती म्हणून धुरा सांभाळली