मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस रुळावरून घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:13 AM2017-07-19T01:13:17+5:302017-07-19T01:13:17+5:30
गेले तीन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे लोणावळ्यात मंकी हिल येथे सब स्टेशनजवळ मंगळवारी दरड कोसळली. यामुळे रेल्वे रुळाच्या खाली
- लोकमत न्यूज नेटवर्क
वावोशी/खोपोली : गेले तीन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे लोणावळ्यात मंकी हिल येथे सब स्टेशनजवळ मंगळवारी दरड कोसळली. यामुळे रेल्वे रुळाच्या खाली असणारा सिमेंटचा खांब घसरला. तसेच एक मोठा दगड रुळावर आल्याने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून हैदराबादला जाणारी रेल्वे रुळावरून घसरून अपघात घडला. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन हा मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या कर्जतमध्ये थांबविण्यात आल्या. साडेतीन तास दुरुस्ती केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मुंबई-पुणे हा रेल्वेमार्ग कर्जतला जोडलेला असल्याने कर्जत व लोणावळा या दोन शहरांच्या मध्यभागातील डोंगरांमधून जाणारी रेल्वे खोपोलीमधून जाते. या मार्गावर मोठा दगड आल्याने रेल्वे रुळावरून घसरली. अपघातानंतर मुंबईतून पुणेमार्गे इतर राज्यात जाणाऱ्या रेल्वे कर्जत येथे थांबण्यात आल्या. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई - कन्याकुमारी एक्स्प्रेस कल्याणला, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस वांगणी येथे, मुंबई-नांदेड कर्जतला थांबविण्यात आली. तर डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस कर्जतला थांबवली. अन्य घाटामध्ये ज्याप्रमाणे दरड प्रतिरोधक लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत त्याचप्रमाणे ठाकूरवाडी, खंडाळा घाटात बसविण्यात याव्यात. जेणेकरून संभाव्य अपघात टळतील, असे रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या पंकज ओसवाल यांनी सांगितले.
पुण्याकडे जाणाऱ्या खोळंबलेल्या गाड्या
सिंहगड एक्स्प्रेस(४.१५) कोणार्क एक्स्प्रेस(५.००) भुवनेश्वर एक्स्प्रेस (५.१५) कन्याकुमारी एक्स्प्रेस (५.३०) प्रगती एक्स्प्रेस (६.००)
डेक्कन क्वीन (६.४०)
सह्याद्री एक्स्प्रेस (७.५०)