मुंबई, मला तुझ्यावर भरोसा आहे ! RJ मलिष्काचा मनपाला टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:12 PM2017-07-19T12:12:10+5:302017-07-19T13:34:27+5:30
मुंबई महापालिकेच्या कारभारावर "मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?" या गाण्यातून ताशेरे ओढणा-या सुप्रिद्ध आर.जे. मलिष्कानं पुन्हा एकदा मनपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - मुंबई महापालिकेच्या कारभारावर "मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?" या गाण्यातून ताशेरे ओढणा-या सुप्रिद्ध आर.जे. मलिष्कानं पुन्हा एकदा मनपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
"मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?", या गाण्यातून पावसाळ्यात होणारी मुंबईची दैनावस्था मांडली होती. यामुळे मलिष्का सध्या मुंबई मनपाच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आर जे मलिष्काने मुंबई मनपाला आणखी एक टोला लगावला आहे. या सर्व घटनाक्रमादरम्यान, मुंबईकर मलिष्काला पूर्णपणे पाठिंबा देत आहे.
यासंदर्भात मलिष्काने ट्विट करुन मुंबईकरांचे, मुंबईचे आभार मानले आहेत. ""मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात. मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा आहे"", असे ट्विट मलिष्कानं केले आहे.
आणखी बातम्या वाचा
तर दुसरीकडे महापालिकेच्या अधिका-यांनी मलिष्का राहत असलेल्या इमारतीची मंगळवारी (18 जुलै )तपासणी केली. यावेळी महानगरपालिकेच्या अधिका-यांना तपासणीदरम्यान मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं मलिष्काला नोटीस बजावली आहे.
वांद्रे पश्चिमेकडील पाली नाका येथील सन राईज इमारतीमध्ये बुधवारी एच वेस्ट वॉर्ड कार्यालयाच्या अधिका-यांनी तपासणी केली असता लिली मेंडोंसा यांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. शोभेच्या कुंडीखाली ठेवलेल्या डिशमध्ये साठलेल्या पाण्यात या अळ्या सापडल्या. लिली मेंडोंसा ( ६५ वर्ष) म्हणजे मलिष्काची आई असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.
पालिकेनं बजावली नोटीस
डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी यासाठी पालिका जनजागृती करत असतानाही सुशिक्षितांच्या घरात कशी बेफिकिरी असते याचे उदाहरण मलिष्काने दिले आहे. या प्रकरणी एच वॉर्ड कार्यालयाने लिली यांना नियमानुसार नोटीस बजावली आहे.
दरम्यान, यापूर्वी मलिष्काच्या ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?’ गीतामुळे महापालिकेचीच नव्हे तर मुंबई शहराची जागतिक स्तरावर बदनामी होत आहे. त्यामुळे मलिष्कावर कायदेशीर कारवाई करीत तिच्या विरोधात ५00 कोटी रुपयांचा दावा महानगरपालिकेने दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली होती. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन त्याबाबत विधि खात्याचे मत मागविल्याचे सूत्रांकडून समजते.
‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?’ हे गीत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात रेडिओ जॉकी मलिष्का ‘मुंबईत पाणी तुंबतं, रेल्वे सेवा लेट होते’, ‘मुंबईत खड्डे पडतात आणि पावसात पालिकेची पोलखोल होते’ असे गीताद्वारे सांगते आहे. पहारेकरी आधीच दबा धरून बसले असताना हे गाणे म्हणजे भाजपाच्या हाती आयते कोलीत आल्यासारखे आहे. त्यामुळे मलिष्कावर कारवाईची मागणी करीत प्रतिस्पर्ध्यांचे तोंड बंद करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे.
त्यानुसार शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले व समाधान सरवणकर यांनी आयुक्तांची मंगळवारी ( 18 जुलै ) त्यांच्या दालनात भेट घेतली. या गीतामुळे महापालिकेचीच नव्हे तर संपूर्ण मुंबई शहराची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. मुंबईविषयी चुकीचा संदेश पसरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे नगरसेवक अमेय घोले यांनी सांगितले, याची दखल घेऊन आयुक्तांनी विधि खात्याकडे याविषयी मत मागितले आहे.