मुंबई-इंदूर १ तास ५६ मिनिटांमध्ये
By admin | Published: March 6, 2016 03:30 AM2016-03-06T03:30:56+5:302016-03-06T03:30:56+5:30
इंदूरमधील २०वर्षीय तरुणाच्या हृदयामुळे ओडिशातील एका तरुणास जीवनदान मिळाले आहे. इंदूर ते मुंबईतील रुग्णालय असे ५४६ किमीचे अंतर केवळ १ तास ५६ मिनिटांमध्ये पूर्ण करून
मुंबई : इंदूरमधील २०वर्षीय तरुणाच्या हृदयामुळे ओडिशातील एका तरुणास जीवनदान मिळाले आहे. इंदूर ते मुंबईतील रुग्णालय असे ५४६ किमीचे अंतर केवळ १ तास ५६ मिनिटांमध्ये पूर्ण करून हे हृदय प्रत्यारोपणासाठी आणण्यात आले.
इंदूर येथील एका २०वर्षीय तरुणाचा अपघात झाला. त्याच्या डोक्याला मार बसला होता. उपचारादरम्यान या तरुणाला ब्रेनडेड घोषित केल्यावर त्याच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्याच्या पालकांनी हृदय, यकृताचे दान केले. यकृत दिल्लीच्या एका रुग्णालयात नेण्यात आले. तर, हृदय मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात आणण्यात आले. २०वर्षीय तरुणाला इंदूरच्या चोटीराम रुग्णालयात ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यावर साडेबाराच्या सुमारास त्याचे हृदय काढण्यात आले. त्यानंतर १२ वाजून ४३ मिनिटांनी हृदय घेऊन डॉक्टर इंदूर विमानतळावर पोहोचले. त्यानंतर १ तास ५६ मिनिटांमध्ये म्हणजेच २ वाजून १४ मिनिटांनी हृदय फोर्टिस रुग्णालयात आणण्यात आले.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २२वर्षीय तरुणाला कार्डिओ मायोपॅथी हा आजार होता. या आजारामुळे त्याच्या हृदयाचे कार्य कमी झाले होते. त्यामुळे अंतिम पर्याय म्हणजे हृदयप्रत्यारोपण हाच होता. इंदूर येथील तरुणाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे या तरुणाला
जीवनदान मिळाले. शस्त्रक्रियेनंतर त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी) आता रुग्णाची प्रकृती स्थिर
गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. त्यानंतर हृदयप्रत्यारोपणाविषयी झालेल्या जनजागृतीमुळे आज १२वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. आता या मुलाची प्रकृती स्थिर आहे. पुढचे ४८ ते ७२ तास त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, असे हृद्यशल्यचिकित्सक डॉ. अन्वय मुळे म्हणाले.