मुंबई देशातील सर्वात महागडे शहर; दिल्लीलाही टाकले मागे, चेन्नई तिसऱ्या, बंगळुरू चौथ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:33 AM2022-06-30T11:33:18+5:302022-06-30T11:35:04+5:30
‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’, अर्थात राहणीमानाचा खर्च आणि यास पूरक मुद्यांच्या अनुषंगाने एका आंतरराष्ट्रीय कंपनीने आशिया खंडातील काही प्रमुख देश आणि त्यातील प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षण केले.
मुंबई : जीवनशैली, राहणीमान, दैनंदिन खर्च, जागांचे भाव अशा विविध मुद्यांच्या आधारे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर देशातले सर्वात महागडे असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, महागड्या शहरांच्या यादीत मुंबई शहराने देशाची राजधानी दिल्लीलाही मागे टाकले आहे. दिल्ली दुसऱ्या, तर चेन्नई तिसऱ्या, बंगळुरू चौथ्या आणि हैदराबाद पाचव्या क्रमांकावर आहे.
‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’, अर्थात राहणीमानाचा खर्च आणि यास पूरक मुद्यांच्या अनुषंगाने एका आंतरराष्ट्रीय कंपनीने आशिया खंडातील काही प्रमुख देश आणि त्यातील प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षण केले. दरवर्षी होणाऱ्या या सर्वेक्षणात घरगुती वापराच्या वस्तू, अन्नधान्याच्या किमती, घरांच्या किमती, वाहतुकीचा खर्च, खाद्यान्नाच्या किमती, कपडे, मनोरंजनावर होणारा खर्च आदी महत्त्वपूर्ण घटक विचारात घेतले जातात. शहरनिहाय या घटकांच्या किमती, तेथील नागरिकांचे उत्पन्न आणि या घटकांवर होणारा खर्च याचे समीकरण मांडले जाते आणि त्यानुसार शहरांची क्रमवारी जाहीर केली जाते. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे विद्यार्थ्यांपासून प्रत्येक घरातील जवळपास सर्वच सदस्यांचे काम हे ऑनलाइन पद्धतीने झाले. त्यामुळे यंदाच्या सर्वेक्षणामध्ये मोबाइल, टॅब्लेट, कॉम्प्युटर या घटकांच्या किमतीदेखील विचारात घेण्यात आल्या आहेत.
मुंबईनंतर पुणे महागडे -
देशात मुंबई हे सर्वात महागडे शहर जरी असले, तरी महाराष्ट्रात मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर आहे. पुण्यातील जागांच्या किमती तसेच राहणीमान हे दोन्ही राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत महागडे असल्याचे दिसून आले आहे.
...तरीही मुंबईलाच पसंती
- सर्वेक्षणानुसार आशिया खंडात सर्वात महागडे राहणीमान आणि जीवनशैली ही हाँगकाँगची असून, त्यापाठोपाठ सिंगापूर, बिजिंग यांचा समावेश आहे.
- परंतु मुंबई येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे आणि त्या देशांच्या / शहरांच्या तुलनेत मुंबई स्वस्त असल्याने कंपनीचे कार्यालय सुरू करताना इतर देशांच्या तुलनेत बहुराष्ट्रीय कंपन्या पहिली पसंती मुंबईलाच देत असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई का महाग?
अन्नधान्य, औषधी, कपडे, जागा अशा सर्वच घटकांच्या किमती या देशातील अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक आहेत. या किमती देशातील अन्य मेट्रो शहरांच्या तुलनेत किमान २० टक्के ते कमाल ४० टक्के अधिक आहेत. त्यामुळेच महागड्या शहरांच्या यादीत मुंबईने पहिला क्रमांक गाठला आहे.