३० जुलैपासून मुंबई होणार पोलीस छावणी

By admin | Published: July 26, 2015 04:20 AM2015-07-26T04:20:08+5:302015-07-26T04:20:08+5:30

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला एकमेव आरोपी याकूब मेमनला ३० जुलैला फासावर लटकाविण्याचे ‘डेथ वॉरन्ट’ टाडा न्यायालयाने जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत

From Mumbai on July 30, the police camp will be held in Mumbai | ३० जुलैपासून मुंबई होणार पोलीस छावणी

३० जुलैपासून मुंबई होणार पोलीस छावणी

Next

- डिप्पी वांकाणी, मुंबई
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला एकमेव आरोपी याकूब मेमनला ३० जुलैला फासावर लटकाविण्याचे ‘डेथ वॉरन्ट’ टाडा न्यायालयाने जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काहीही गडबड होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची योजना आखली आहे. याकूबच्या याचिकेवर सोमवारी
सुप्रीम कोर्टाचा निकाल लागताक्षणी मुंबईला पोलिसी छावणीचे रूप येईल. याकूबच्या फाशीवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर मुंबईतील कायदा-सुव्यवस्था चोख ठेवण्यासह सुरक्षेच्या दृष्टीने काय काय उपाययोजना कराव्या लागतील, या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलाविली होती. त्यात झालेल्या निर्णयानुसार ४ हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात तैैनात करण्यात येणार आहेत. शहरात ‘विजयोत्सव’ आणि ‘बॉम्बस्फोटातील बळी’ यासंदर्भातील एकही फलक झळकणार नाही, याची काळजी पोलीस घेतील. विमानतळ ते दफनभूमीपर्यंत मोठा फौजफाटा असेल. याशिवाय सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस संचलन करतील.
मारिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आताच्या योजनेनुसार ३० तारखेलाच फासावर चढविल्यास याकूब मेमनचे पार्थिव नागपूरहून मुंबईला आणले जाईल, त्या दिवशी (३१ जुलै) शुक्रवार असल्याचे लक्षात घेऊन बहुतेक सारे अधिकारी रस्त्यांवर तैनात असतील. याकूबला फाशी दिल्यानंतर आठवडाभर ही सुरक्षा योजना राबविण्यात येईल.
याकूबला फाशी होणारच, या गृहीतकावर या उपायांची आखणी बेतलेली आहे. सर्व पोलीस उपायुक्तांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विमानतळ पोलीस उपायुक्तांना विमानतळावर गर्दी होणार नाही, तसेच शववाहिनी विनाअडथळा विमानतळावरून पुढे मार्गस्थ होईल; याबाबत काटेकोर दक्षता घेण्यास सांगण्यात आले
आहे.
माहीम किंवा डोंगरी येथील दफनभूमीत याकूब मेमनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. प्रार्थनेच्या वेळेस भाषण करताना या घटनेची चर्चा टाळावी, अशी विनंती समुदायाच्या नेत्यांना करण्यात आली आहे. दफनभूमीनजीक पोलिसांसोबत राखीव दलाचे पोलीसही तैैनात असतील.
विभाग प्रमुख आणि पोलीस उपायुक्तांना आपापल्या हद्दीत जातीने फिरून राजकीय पक्षांचे या विषयावरील फलक काढण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पुतळ्यांना लक्ष्य करण्याचा समाजकंटक प्रयत्न करू शकतात, त्या पार्श्वभूमीवर सर्व पुतळे झाकण्याचे व त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
मॉल्स, मल्टिप्लेक्स तसेच ज्या ठिकाणी आधी बॉम्बस्फोट झाले होते, त्या ठिकाणीही मॉक ड्रील सुरू करण्यात आले आहे. तसेच सर्व अधिकारी आणि पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या ३० जुलैपासून आठवडाभरासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. जोगेश्वरी, गोवंडी यासारख्या ठिकाणीही खबदारीचे उपाय योजण्यात येणार आहेत.


याकूबला ३० तारखेला फासावर चढविल्यास त्याचे पार्थिव नागपूरहून मुंबईला आणले जाईल, त्या दिवशी (३१ जुलै ) शुक्रवार असल्याचे लक्षात घेऊन बहुतेक सारे अधिकारी रस्त्यांवर तैनात असतील.
- राकेश मारिया, मुंबईचे पोलीस महासंचालक

Web Title: From Mumbai on July 30, the police camp will be held in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.