मुंबई, कोकणात जोरधार; कोल्हापुरामध्ये पूरस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 02:06 AM2019-09-08T02:06:18+5:302019-09-08T02:06:29+5:30
पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; गडचिरोलीत पाण्याच्या पातळीत वाढ
कोल्हापूर/मुंबई : मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती ३७ फुटांवर पोहोचली आहे. महापुराची ३९ फुटांची इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक राहिल्याने धास्तीने नागरिकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून एक गणेश भक्त वाहून गेल्याची घटना घडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील ६५ बंधारे पाण्याखाली गेल्याने २० मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्यांना नदीकाठच्या गावांजवळ तैनात करण्यात आले आहे. नदीकाठच्या १२९ आणि पूरबाधित ३६३ गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोयना धरणातून ४१ हजार ८८८ क्युसेक विसर्ग केला जात आहे. कृष्णा व कोयना नद्यांना पूर आला आहे. सांगलीत कृष्णा नदीपातळी मंदगतीने कमी होत असली तरी पुराचा धोका अद्याप टळलेला नाही.
गोव्यात जनजीवन विस्कळीत
गोव्यात पावसाचा मारा जोरात सुरू असून पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोलीत अनेक मार्ग बंद सतत दुसऱ्या दिवशीही गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती कायम आहे. अनेक मार्ग बंद आहेत. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.