मुंबई ते लातूर नवा राष्ट्रीय महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:28 AM2018-05-11T04:28:45+5:302018-05-11T04:28:45+5:30
मुंबई ते लातूर असा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. मुंबई ते पुणे असा जुना रस्ता तयार आहे. त्यामुळे आता तळेगाव दाभाडे ते लातूर या पुढील रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे.
- अभिजित कोळपे
पुणे - मुंबई ते लातूर असा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. मुंबई ते पुणे असा जुना रस्ता तयार आहे. त्यामुळे आता तळेगाव दाभाडे ते लातूर या पुढील रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे ते न्हावरा, तर दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी-जामखेड बीड ते लातूर असा मार्ग करण्यात येणार असून, एकूण ५५० किलोमीटरचा हा नवा ‘राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी’ नावाने ओळखला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
या नव्या राष्टÑीय महामार्गामुळे लातूरला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. पूर्वी पुण्याहून बीड-लातूरला जाण्यासाठी पुणे-अहमदनगर आणि पुणे-सोलापूर मार्ग असे दोन पर्याय होते. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राज्य महामार्ग म्हणून चाकण ते न्हावरा असे नियोजित केले होते. त्यातील चाकण ते शिक्रापूर हा चारपदरी रस्ता सुस्थितीत असून वापरात आहे. तर शिक्रापूर ते न्हावरा असा ३६.९ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सर्व्हे करून एका बाजूचे भूसंपादन करून संबंधित शेतकºयांना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मोबदला यापूर्वीच देण्यात आला आहे. सहा ते आठ महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे़
३६ किलोमीटरचा रस्ता रखडला
- शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते न्हावरा असा ३६.९ किलोमीटरचा रस्ता रखडला आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी मागील काही वर्षांपासून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व्हे करून एका बाजूने भूसंपादन करून दोन वर्षांपूर्वी शेतकºयांना मोबदलाही दिला आहे.
- मात्र प्रत्यक्ष कामाला मुहूर्त लागला नाही. तळेगाव दाभाडेमार्गे बीड-लातूरला जाणाºया महामार्गावर चाकणच्या आंबेठाण चौकातून भुयारी मार्ग, तर पुणे-नाशिक महामार्गावर उड्डाणपूल बनवण्यात येणार आहे. तसेच पुढे शिक्रापूर येथे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन या मार्गावर भुयारी, तर पुणे-अहमदनगर मार्गावर उड्डाणपूल प्रस्तावित आहे.
वाढीव मोबदला द्या
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी शिक्रापूर ते न्हावरा असा ३६.९ किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी एका बाजूने भूसंपादन केले आहे. शिक्रापूर ते न्हावरा या रस्त्यासाठी एका बाजूने झालेले भूसंपादनातील काही शेतकºयांनी आता नव्याने वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे.