...तर राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल; मुख्यमंत्री ठाकरे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 07:50 AM2021-08-09T07:50:52+5:302021-08-09T07:51:43+5:30
ॲपवर नोंदणी करावी लागणार; हॉटेल, मॉलचा निर्णय आजच्या बैठकीत
मुंबई : कोविड प्रतिबंधक लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या स्वातंत्र्य दिनापासून अर्थात १५ ऑगस्टपासून लोकल सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी संवाद साधताना केली.
सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी या मागणीचा रेटा वाढत होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज नागरिकांशी संवाद साधत कोविडसह विविध विषयांवर भाष्य केले. कोविडचा धोका अद्याप टळलेला नाही. अजूनही आपण दुसऱ्या लाटेतून पूर्णपणे सावरलेलो नाही. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही आहे. मात्र तरीही अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यासाठी राज्य सरकारने विशेष
ॲप तयार केले आहे. एक-दोन दिवसांत हे या ॲप सर्वांसाठी खुले होईल. या ॲपमध्ये दोन्ही लस घेतल्याची माहिती भरल्यानंतर प्रवासासंदर्भात कार्ड दिले जाईल आणि त्यानुसार प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसतील त्यांच्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात ऑफलाइन नोंदणीची व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
... तर पुन्हा लाॅकडाऊन
कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. तिसरी लाट येत असल्याचे जाणवल्यास राज्यातील ऑक्सिजन, बेडची उलब्धता आणि रुग्णवाढीचा कालावधी लक्षात घेऊन वेळीच पुन्हा एकदा लाॅकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
एक-दोन दिवसांत विशेष ॲप सर्वांसाठी खुले होईल. या ॲपमध्ये दोन्ही लस घेतल्याची माहिती भरल्यानंतर प्रवासासंदर्भात कार्ड दिले जाईल आणि त्यानुसार प्रवास करता येईल. सर्व खबरदारी घेत हे निर्बंध हटवण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादाही वाढवावी लागेल
आरक्षण देण्याचा अधिकार पुन्हा एकदा राज्यांना बहाल करण्याबाबतची सुधारणा केंद्र सरकार करणार आहे. परंतु, केवळ हा अधिकार देऊन चालणार नाही. तर, आरक्षणासाठीची ५० टक्क्यांची मर्यादाही वाढवावी लागेल. ही अट शिथिल केल्यास ज्यांना आवश्यक आहे त्यांना आम्ही आरक्षण देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना सांगितले.
टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आणखी सवलती जाहीर करण्याबाबत निर्णय
हाॅटेल्स, रेस्टॉरंट, काॅल, प्रार्थनास्थळांना आणखी सवलती देण्यासाठी, उघडण्याबाबत सोमवारी टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा केली जाईल. या बैठकीनंतर त्या संदर्भातील निर्णय केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तोपर्यंत सर्वांनी संयम बाळगायला हवा. संयम तोडू नका. काहीजणांचे हे उघडा, ते उघडा सुरू आहे. समाजघटकांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, या उचापतखोरांचे नागरिकांनी ऎकले नाही. ते सरकारसोबत राहिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारच्या १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी मिळावी म्हणून प्रवासी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. सामान्य प्रवाशांच्या वतीने सरकारचे अभिनंदन.
- मधू कोटीयन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून प्रवासाची मुभा दिली तरी पहिला डोस घेतला त्यांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. तसेच अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे सरकारने लसीकरण मोहिमेला गती द्यावी.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यासाठी अद्याप राज्य सरकारचा प्रस्ताव रेल्वेकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर रेल्वे सुरू होईल. राज्य सरकारची जी नियमावली असेल त्याचे पालन केले जाईल.
- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे