मुंबई मॅरेथॉनमुळे मोर्चे, आंदोलने थंडावली
By Admin | Published: January 14, 2015 06:45 AM2015-01-14T06:45:04+5:302015-01-14T06:45:04+5:30
मुंबईमध्ये १८ जानेवारीला पार पडणाऱ्या मॅरेथॉनचा फटका राज्यातील शोषित आणि दुर्लक्षित घटकांना आणि संघटनांना बसला आहे.
मुंबई : मुंबईमध्ये १८ जानेवारीला पार पडणाऱ्या मॅरेथॉनचा फटका राज्यातील शोषित आणि दुर्लक्षित घटकांना आणि संघटनांना बसला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आझाद मैदानावर मोर्चे आणि आंदोलन करण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात येत आहे. परिणामी मोर्चे आणि आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्यासाठी १९ तारखेनंतरचा मुहूर्त देण्यात येत आहे.
तीव्र लढ्यानंतर मानधन वाढ मिळवण्यात यश मिळवलेल्या अंगणवाडी सेविकांचे वाढीव मानधन २०१४ सालातील मे महिन्यापासून मिळणे अपेक्षित होते. मात्र नव्या सरकारने वेतन थकवल्याने अंगणवाडी सेविकांनी १२ जानेवारी रोजी थाळीनाद मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता हा मोर्चा २१ जानेवारीला निघणार आहे. आझाद मैदानाचा कॉर्पोरेट वापर होत असल्याने कामगार नेत्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाला महसूल मिळतोय म्हणून मैदानाचा काही भाग स्पर्धेच्या आयोजनासाठी देण्यात काहीच गैर नाही. मात्र आंदोलकांना परवानगी नाकारणे म्हणजे लोकशाहीचा खून असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया काही कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केल्या
आहेत. (प्रतिनिधी)