मुंबईत महापौर शिवसेनेचाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2017 05:18 AM2017-01-03T05:18:45+5:302017-01-03T06:15:11+5:30
‘मिशन १००’ घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या भाजपाने आपला महापौर निवडून आणण्याचा निर्धार केला आहे
मुंबई : ‘मिशन १००’ घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या भाजपाने आपला महापौर निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. मात्र निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेवर भगवाच फडकणार आणि महापौर शिवसेनेचाच असेल, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केली. पालिकेच्या कार्यक्रमात एकाच मंचावर असताना ठाकरे यांनी गर्जना करत मित्रपक्षाला थेट आव्हान दिले.
समाजसुधारक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचे पालिका सभागृहात आज अनावरण करण्यात आले. या वेळी भाषणात उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षाचा अप्रत्यक्ष समाचार घेतला. मुंबईत अनेक कावळे काव काव करतात. महापालिकेच्या कारभारावर टीका करणारेही अनेक आहेत, असा टोला या वेळी लगावला. महापालिकेच्या कारभाराची पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण होत असताना मी आलो आहे. पुन्हा निवडणुकीनंतर मार्चमध्ये येईन, तेव्हा महापौर आपलाच असणार, असे त्यांनी ठासून सांगितले.
बजेट मोठे, बँकांमध्ये मोठ्या ठेवी मात्र विकासकामे नाहीत, पालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार अधिक, असे अनेक आरोप भाजपातून झाले आहेत. त्याचे अप्रत्यक्ष स्मरण करत मुख्यमंत्री आणि भाजपाला ठाकरे यांनी धन्यवाद दिले. तुम्ही खांद्याला खांदा लावून रहिला नसतात तर महापालिकेचे एकही काम पूर्ण झाले नसते. महापालिकेत शिवसेनेने केलेल्या कामांमध्ये भाजपाचाही मोलाचा वाटा असल्याचा चिमटा ठाकरे यांनी काढला. मात्र मुख्यमंत्र्यांनी या टोलेबाजीवर
कोणतेही राजकीय प्रत्युत्तर देणे टाळले.
पारदर्शक कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा आग्रह
गेल्या वर्षभरात महापालिकेत अनेक घोटाळे उघड झाल्यामुळे भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी यावर महापालिकेच्या कार्यक्रमात कोणतेही विधान करणे टाळले. आॅनलाइन परवाने दिल्यामुळे जागतिक बँकेत महापालिकेची रँकिंग वाढेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महापालिकेत मोठ्या प्रमाणावर माहिती अधिकाराखाली अर्ज केले जातात. पालिकेच्या कारभाराची सर्व माहिती वेब पोर्टलवर आल्यास अशा प्रकारच्या अर्जांची संख्या दहा टक्क्यांवर येईल. तसेच प्रशासनावर आपोआपच अंकुश येऊन कारभार पारदर्शक होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
शिवसेनेने थोपटली स्वत:ची पाठ
पारदर्शकता दुर्मीळ होत चालली असताना महापालिकेचा कारभार अधिकाधिक पारदर्शक करण्याचा आयुक्तांचा प्रयत्न आहे. कोणाच्या मनात या बाबत किंतु-परंतु असता कामा नये. कारभार स्वच्छ असला पाहिजे. देशात इतका स्वच्छ आणि पारदर्शक कारभार असलेली मुंबई महापालिका एकमेव असल्याचे छातीठोकपणे सांगत उद्धव ठाकरे यांनी स्वत:चीच पाठ थोपटली.
महापौरांकडे प्रबोधनकारांचे लक्ष
प्रबोधनकारांचे तैलचित्र महापालिका मुख्यालयातील सभागृहात महापौरांच्या आसनासमोर लावण्यात आले आहे. त्यामुळे महापौरांच्या कारभारावर प्रबोधनकारांचे लक्ष राहील, असा इशारा त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना दिला.
पालिकेत होती ११ तैलचित्रे
महापालिकेच्या सभागृहात एकूण ११ तैलचित्रे होती. मात्र सन २००० मध्ये सभागृहात लागलेल्या आगीत नऊ तैलचित्रे खाक झाली. नूतनीकरणानंतर मात्र ही तैलचित्रे लावण्यात आली नव्हती. मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सेनानी आचार्य दोंदे यांची तैलचित्रे आहेत. त्यानंतर आता प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र आज लावण्यात आले.
प्रबोधनकारांची आठवण थोडी उशिराने
प्रबोधनकार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे आजोबा. मात्र त्यांचे तैलचित्र सभागृहात लावण्याचा ठराव मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी पालिका महासभेपुढे २०१४ मध्ये मांडला होता. त्यानंतर जाग आलेल्या शिवसेनेने आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून हा प्रस्ताव महापालिकेपुढे आणला. यावर अप्रत्यक्ष टोला लगावत प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात थोडा उशीरच झाला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.