मुंबई महापौर कुस्तीमध्ये रंगला वाद
By admin | Published: June 7, 2016 07:43 AM2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30
मुंबई महापौर कुस्ती स्पर्धेत पंचानी दिलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका पहिलवान नवनाथ इंगळेला बसल्याचा आरोप त्याच्या समर्थकांनी करीत चांगलाच हंगामा केला
महेश चेमटे,
मुंबई- मुंबई महापौर कुस्ती स्पर्धेत पंचानी दिलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका पहिलवान नवनाथ इंगळेला बसल्याचा आरोप त्याच्या समर्थकांनी करीत चांगलाच हंगामा केला. पंचानी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे नवनाथचे ७४ किलो वजनी गटात अजिंक्यपद मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळून त्याला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागल्याचा आरोप त्याच्या पाठीराख्यांनी केला. त्याचवेळी, यामध्ये आमची कोणतीही चूक नसल्याचे सांगत पंचांनी काहीही सांगण्यास नकार दिला.
कुर्ला येथील सर्वेश्वर मैदानात मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेच्या व मुंबई उपनगर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेत १३ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांनी सहभाग घेतला होता. उपांत्य फेरीत नवनाथ विरुद्ध अक्षय मोडक कुस्तीला वादाचे रंग लागले. एखादा मल्ल रोखून कुस्ती करत असेल आणि प्रतिस्पर्धी आक्रमक कुस्ती खेळत असेल तर रोखून कुस्ती खेळणाऱ्याला गुण दिला जातो. मात्र या लढतीत तीन वेळा अक्षय आक्रमक कुस्ती करत होता तर नवनाथ रोखून कुस्ती करत होता. तरीही पंचांनी तिन्ही वेळा अक्षयला गुण दिल्याचे नवनाथ समर्थकांचे म्हणणे आहे. कुस्ती संपल्यानंतर नवनाथच्या सहकाऱ्यांनी पंचाना कुस्तीची चित्रफीत दाखवली असता पंचांनी ही आमची चूक नसल्याचे सांगितले. मैदानावरील पंचांशी याबाबत विचारणा केली असता त्यांनीही ही माझी चूक नसल्याचे सागितले. त्यामुळे पंचांच्या चुकीमुळे नवनाथचे वर्ष वाया गेले, असा आरोप त्याच्या सहाकार्यांनी केला आहे.
>मूळचा बार्शी येथे राहणारा नवनाथ इंगळे कोल्हापूरच्या न्यू मोतीराम तालीममध्ये कुस्तीचा सराव कतो. नवनाथ हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील यांचा सहकारी आहे. नवनाथने पाटील यांच्याकडून कुस्तीचे डाव शिकून अनेक राष्ट्रीय मल्लांना चीतपट केले.
>आम्ही कोणत्याही मल्लावर अन्याय करत नाही. जो चांगला खेळेल तोच जिंकेल. प्रत्येक वजनीगटातील मल्लांनी आपल्या ताकदीच्या बळावर आणि कुस्ती कौशल्यावर बाजी मारली. पराभवामुळे नाराज झाल्यानंतर मल्ल असा आरोप करीत असतात.
- संपतराव साळुंखे, अध्यक्ष, मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघ
>...आणि ‘माउली’चा गजर
खुल्या गटात सोलापूरच्या माउली जामदांडेने पुण्याच्या शिवराज राक्षेला १३-३ असे लोळवून महापौर चषकावर नाव कोरले. पंचांनी माउलीचा हात विजयी म्हणून उंचावताच प्रेक्षकांनी ‘माउली, माउली’ असा गजर सुरू केला. त्याचवेळी कुमार गटात पुण्याच्या ज्योतिबा आटकळेने बाजी मारली. ६५ किलो वजनी गटात सूरज कोकाटेने वर्चस्व राखले, तर ७४ किलो वजनी गटात पुण्याच्या अक्षय मोडकने विजय मिळवला. तर जेतेपदाच्या लढतीत वाद झाल्यानंतर नवनाथने पुण्याच्या रवि वरेला नमवूण तिसरे स्थान मिळवले.