पावसाचा कहर! मुंबई, ठाणे, रायगड, पालघरच्या शाळांना गुरुवारी सुट्टी! मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 07:12 PM2023-07-19T19:12:14+5:302023-07-19T19:13:12+5:30

रेल्वे स्थानकावरील गर्दी पाहता ज्यादा बसेस सोडण्याचेही दिले आदेश

Mumbai Monsoon Updates Schools in Mumbai Thane Raigad districts will be closed tomorrow says- Chief Minister Eknath Shinde | पावसाचा कहर! मुंबई, ठाणे, रायगड, पालघरच्या शाळांना गुरुवारी सुट्टी! मुख्यमंत्र्यांची घोषणा

पावसाचा कहर! मुंबई, ठाणे, रायगड, पालघरच्या शाळांना गुरुवारी सुट्टी! मुख्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext

Mumbai Monsoon Updates, Eknath Shinde: मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना उद्या सुटी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले. IMD ने पुढील दोन-तीन दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चार जिल्ह्यांतील शाळांना सुटी जाहीर केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, पावसाचा जोर पाहता, ज्यादा बसेस सोडण्याचेही निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

"जेथे जेथे पाणी भरू शकते अशा सर्व ठिकाणी यंत्रणा सुसज्ज आहेत. नालासफाई योग्य पद्धतीने झाल्याने यावेळी कुठेही पाणी भरलेले नाही. वॉर्ड ऑफिसर आणि इतर अधिकारी फिल्डवर आहेत. जेथे पाणी जास्त भरत आहे तेथे सक्शन पंप लावले आहेत. त्यामुळे पाणी भरून देत नाहीयेत. मी स्वत: कंट्रोल रूममध्ये जाऊन माहिती घेतली आहे. स्टेशनवर झालेली गर्दी पाहता सीएसटी, भायखळा, दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली या स्टेशनवर BEST आणि एसटीच्या ज्यादा बसेस सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना सुटी देण्यात आली आहे," असे शिंदे यांनी सांगितले.

राज्यभरात पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, वाशीम, गडचिरोली यासह अन्य ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

नागरिकांनी आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. विधानभवन येथे प्रसारमाध्यमांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठल्याही प्रकारे आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत असं म्हटलं आहे. 

Web Title: Mumbai Monsoon Updates Schools in Mumbai Thane Raigad districts will be closed tomorrow says- Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.