मुंबई पालिका घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी
By admin | Published: February 17, 2017 03:03 AM2017-02-17T03:03:37+5:302017-02-17T03:03:46+5:30
हिम्मत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाण्यातील अनेक भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची चौकशी करावी, असे जाहीर
ठाणे : हिम्मत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाण्यातील अनेक भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची चौकशी करावी, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाण्यातील चौक सभेदरम्यान दिले. काँग्रेस आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या गुरुवारी आल्या होत्या. त्या वेळी पत्रकारांशी बोलत होत्या.
कोपरी, खारटन रोड, ढोकाळी आणि शेवटी खोपट येथे त्या रात्री १० च्या सुमारास दाखल झाल्या. त्या वेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. पण, रात्रीचे १० वाजून गेले असल्यामुळे वेळेच्या बंधनामुळे त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले नाही. केवळ हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले आणि प्रचारासाठी प्रोत्साहन दिले.
त्या पुढे म्हणाल्या, शिवसेना आणि भाजपा या पक्षांचे भांडण म्हणजे एक नौटंकी आहे, नवराबायकोच्या भांडणासारखे आहे. भांडण झाल्यानंतर बायको जशी माहेरी रुसून जाते, तसा हा प्रकार सुरू आहे. काही दिवसांतच माहेरी गेलेली बायको पुन्हा नवऱ्याकडे येणार आहे. सत्तेसाठी आणि लाल दिव्यासाठी ते पुन्हा मांडीला मांडी लावून बसणार आहेत. त्यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मुंबई आणि ठाण्यातील भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांनी एसआयटीमार्फत चौकशी लावावी. किरीट सोमय्यांच्याही कंपन्यांची चौकशी करावी, असे जाहीर आव्हान त्यांनी या वेळी दिले.
भाजपाच्या दुटप्पी वागण्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. मुंबई, ठाण्यात वाहतूककोंडीसह पाणी, कचरा अशा अनेक मूलभूत सुविधांची वानवा असून विकास हवा असल्यास राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)