मुंबई सध्या फक्त एकच चर्चा, मराठा मोर्चा-मराठा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 02:21 PM2017-08-08T14:21:26+5:302017-08-08T15:25:32+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईला धडकणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी मोर्चाची माहिती देणारे बॅनर आणि फलक लावण्यात आले आहेत.
मुंबई, दि. 8 - मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईला धडकणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी मोर्चाची माहिती देणारे बॅनर आणि फलक लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर जाहिरातींच्या होर्डिंग्सवर मराठा मोर्चाच्या जाहिराती दिसत आहेत.
आझाद मैदानात धडकणाऱ्या या मोर्चाचे नियोजन पूर्ण झाल्याचा दावा समन्वयकांच्या मुंबई समितीने बुधवारीच केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना वरिष्ठांकडून बुधवारी होणा-या मोर्चाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आझाद मैदान परिसरात मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सर्व मोर्चेकरी जमतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. येथील बहुतेक मुस्लिम संघटनांनीही मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे न भुतो न भविष्यती, असा मोर्चा मुंबईत निघण्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे.
आंदोलकांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईत चौका-चौकांमध्ये माची उभारण्यात आल्या आहेत. या माचीवरून मुंबईकरांसह आंदोलकांना मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय बहुतेक संघटना, संस्था आणि नेते मंडळींकडून चहानाश्त्यासह अल्पोपहाराची व्यवस्था करण्याची घोषणा सुरू आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
मराठा क्रांती मोर्चा काही कारणांमुळे विस्कळीत व्हावा, या हेतूने अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. गाडीवर स्टीकर नसेल तर मुंबईत प्रवेश मिळणार नाही, ट्रॅफिक जाम आहे, अशा प्रकारचे विविध संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. तरी मराठा बांधवांनी या अफवांला बळी न पडता मुंबई गाठायची आहे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समितीने केले आहे.
मुंबईत निघणार २५ लाखांचा महामोर्चा, रेकॉर्डब्रेक मोर्चाचा दावा
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ लाखांहून अधिक आंदोलक महामोर्चात सामील होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीने रेकॉर्डब्रेक मोर्चाचा दावा करत, नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, महामोर्चा हा मूक स्वरूपाचा असून, मुंबईच्या इतिहासात तो सर्वात मोठा असेल. आतापर्यंत ५७ मूक मोर्चे झाले असून, त्याप्रमाणेच या ५८व्या मोर्चाची आचारसंहिता असेल. सकाळी ११ वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल. दरम्यान, कोणत्याही प्रकारची भाषणे आणि घोषणा या वेळी दिल्या जाणार नाहीत. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.
मोर्चाच्या तयारीसाठी आवश्यक पालिका, पोलीस, वाहतूक, अग्निशमन दल आणि इतर आवश्यक यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या मोर्चाला सामाजिक संस्था, गणशोत्सव व दहीहंडी मंडळे, मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांसह राजकीय, मुस्लीम आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे.