मुंबईमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:38 AM2017-10-19T04:38:49+5:302017-10-19T04:39:10+5:30
दिवाळी म्हणजे दीपोत्सव, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण आता हळूहळू बदलत आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन फटाके उडवण्याविरोधात झालेल्या आवाहनांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला...
मुंबई : दिवाळी म्हणजे दीपोत्सव, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण आता हळूहळू बदलत आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन फटाके उडवण्याविरोधात झालेल्या आवाहनांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून फटाके वाजवण्याचे प्रमाण यावर्षी खूपच कमी झाल्याचे नरक चतुर्दशीच्या दिवशी निदर्शनास आले आहे. पर्यावरणप्रेमी आणि शासनाच्या पुढाकाराने राबविलेल्या जनजागृती मोहिमेला यश मिळाल्याची भावना पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.
लहान मुलांना आणि तरुणांना फटाक्यांचे मोठे आकर्षण असते. फटाके वाजवणाºयांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शाळांमधूनच फटाक्यांबाबत जनजागृती केली जाते. सरसकट सर्वच शाळांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांबाबत मार्गदर्शन केले आहे. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.
यंदा फटाक्यांची दुकाने संख्येने खूपच कमी आहेत. दादरमध्ये मागील वर्षी फटाक्यांची सात ते आठ दुकान होती. यंदा मात्र त्याच दादर मार्केटमध्ये फटाक्याची फक्त दोन दुकाने पाहायला मिळाली व फटाक्यांचा एकही स्टॉल नव्हता.
पालिकेकडून फटाक्यांच्या दुकानांसाठीच्या परवान्यांसाठीच्या विविध नियमांची कडक अंमलबजावणी केल्याने यंदा फटाक्यांची दुकाने कमी असल्याचे फटाके विक्रेत्यांनी सांगितले.