मुंबईत आज पेट्रोल 12 पैसे, तर डिझेल 22 पैशांनी स्वस्त
By admin | Published: June 17, 2017 09:20 AM2017-06-17T09:20:11+5:302017-06-17T09:20:11+5:30
16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नियमित बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नियमित बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं आहे. मुंबईकरांसाठी पेट्रोल 12 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी स्वस्त झालं आहे. महत्वाचं म्हणजे निर्णयाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल 1.12 रुपयांनी, तर डिझेलच्या दरात 1.24 रुपयांची कपात झाली होती.
विशेष म्हणजे प्रत्येक पेट्रोल पंपावर वेगवेगळे दर असू शकतील. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन मोठ्या कंपन्या इंधनाच्या दरात दररोज बदल करणार आहेत. बाजारातील घटकांच्या आधारावर यात १५ पैशांचा फरक असू शकेल.
प्रत्येक पंपावर डिस्प्ले बोर्ड असेल. तेल कंपन्या दररोज रात्री ८ वाजता डीलर्सना दराबाबत एसएमएस व ईमेलने सूचना देतील. प्रत्येक पंपाला ट्रान्सपोर्ट खर्च वेगळा लागणार आहे. त्यानुसार दर ठरतील. प्रतिस्पर्धी कंपनी कमी दरात इंधन विक्री करत असेल तर दर वेगळे असू शकतात. हा फरक १० ते १५ पैसे एवढा असेल. फिल्ड ऑफिसरला संपर्क करता येईल. या अधिकाऱ्याचे नाव आणि नंबर पंपावर असेल. दोषींची डीलरशिप रद्द केली जाऊ शकते. शिवाय शिक्षा करण्याचीही तरतूद आहे.
पेट्रोल आणि डिझेलचा दर उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत कायम असेल. त्यानंतर मात्र पुन्हा नव्या दराने पेट्रोल, डिझेलची विक्री केली जाईल. पेट्रोल पंप मालक आणि डिलर्स यांना फटका बसू नये, यासाठी देशभरातील 54 हजार पेट्रोल पंपांवर रात्री 12 ऐवजी सकाळी 6 वाजल्यापासून दर बदलतील.
कच्च्या तेलाचे दर नियमित ठरतात, त्यामुळे भारतातही दररोज दरात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुर्वी 1 मेपासून उदयपूर, जमशेदपूर, पुद्दुचेरी, चंदीगड आणि विशाखापट्टणम या पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलले जात होते. पेट्रोलियम पदार्थाच्या दरामध्ये रोज बदल करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने केली होती. या शहरांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर देशभरात हा नियम लागू करण्यात आला.
असे जाणून घ्या इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावरील दर
- तुम्ही www.iocl.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता.
- Fuel@IOC हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही जवळपासच्या पेट्रोल पंपावरील दर समजतील.
- मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवावा. पण, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणं आवश्यक आहे.
असे जाणून घ्या भारत पेट्रोलियम’च्या पेट्रोल पंपावरील दर
- www.bharatpetroleum.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलच्या दराची माहिती मिळेल.
- मोबाइलवर SmartDrive हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर किंमतीची माहिती मिळेल.
- मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२३११२२२२ या क्रमांकावर SMS पाठवावा. पण, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणं आवश्यक आहे.