वातावरणातील बदलाने मुंबई त्रस्त
By admin | Published: March 7, 2017 05:13 AM2017-03-07T05:13:48+5:302017-03-07T05:13:48+5:30
७, ८, ९ आणि १० मार्चदरम्यान उत्तर कोकण-गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली
मुंबई : मुंबईसह राज्याला वाढत्या कमाल तापमानाचे चटके बसू लागले असतानाच ७, ८, ९ आणि १० मार्चदरम्यान उत्तर कोकण-गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे मुंबईत ऊन आणि थंडीचा खेळ सुरू आहे. येथे दिवसा कडाक्याचे ऊन पडत असून, रात्री गार वारे वाहत आहेत. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम असून, हवामानातील बदलामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. (प्रतिनिधी)