Mumbai Plane Crash: मोठा खुलासा; मुख्यमंत्र्यांचं 'ते' अपघातग्रस्त हेलिकॉप्टरही 'यूवाय' कंपनीचंच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 02:16 PM2018-06-29T14:16:06+5:302018-06-29T15:00:50+5:30
राज्य सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे.
मुंबई- घाटकोपर येथे काल अपघातग्रस्त झालेल्या चार्टर्ड विमानामुळे अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. यूवाय कंपनीचे हे विमान काल घाटकोपरमधील रहिवासी भागात कोसळल्यानंतर ते गुटखाकिंग कोठारी यांचे असल्याचे समजले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टरही याच कंपनीचं असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या दौऱ्यांसाठी वापरत असलेल्या हेलिकॉप्टरबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वारंवार अपघात तसेच उड्डाण व प्रवासामध्ये येणारे अडथळे यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर चर्चेत राहिले आहे. आता कालच्या अपघातानंतर हे हेलिकॉप्टरही यूवाय कंपनीचं असल्याचं लक्षात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरवरुन गडचिरोलीला जात असताना एकदा या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. लातूरमध्ये एकदा त्याचं क्रॅश लँडिंग झालं होतं. त्यानंतर अलिबाग येथेही एका कार्यक्रमास ते गेले असताना ते हेलिकॉप्टरमध्ये आत प्रवेश करण्यापुर्वीच इंजिन सुरु झाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच नाशिकवरुन औरंगाबादला जात असताना ठराविक मर्यादेपलिकडे हेलिकॉप्टरमध्ये वजन जास्त झाल्यामुळेही उड्डाणात अडथळा आला होता.
काल घाटकोपर पश्चिमेकडच्या जीवदया लेनमधल्या पृथ्वी बिल्डिंगजवळ झालेल्या या अपघातात एकूण पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. विमानाच्या पायलट मारिया कुबेर, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे यांच्यासोबत पादचारी गोविंद पंडित यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. दरम्यान, पायलट मारिया यांचे पती प्रभात कथुरिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना खराब हवामान असतानाही कंपनीने विमानाची चाचणी घेण्यास भाग पाडले, असा आरोप केला.
घाटकोपर येथील अपघातग्रस्त चार्टर्ड विमानाची पायलट मारिया प्रभात जुबेरी (47) ही मीरा रोडच्या काशीमीरा परिसरातील जयनगर रो हाऊस येथे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पती व मुलीसोबत राहते. ती कामाच्या सोयीनुसार मुंबईच्या जुहू तर रोडवरील रशीद मंझील इमारतीत फ्लॅट नं. 19 मध्ये सुद्धा वास्तव्य करीत असे. 2005 ते 06 दरम्यान ती एअर वर्क्स इंजिनीरिंग मध्ये प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून कार्यरत होती. जुलै 2006 ते एप्रिल 2010 मध्ये तीने ताज एअर लिमिटेड मध्ये एक्झीक्यूटिव्ह पायलट म्हणून काम केले. तिने आतापर्यंत एअर क्राफ्ट फाल्कन 2000, किंग एअर सी 90, टिबी 20 ही विमाने चालविली होती. तिची मुलगी परिसरातील महाविद्यालयात 11 वी मध्ये शिकत असून मुलीच्या शिक्षणासाठी तीने 2 वर्षे ब्रेक घेतला होता. तने गुरुवारी सकाळी 8 वाजता घर सोडले होते.