Shraddha Walker Murder Case: श्रद्धा हत्याकांडप्रकरणी मुंबई पोलीस अडचणीत? अधिकाऱ्यांच्याच चौकशीचे आदेश निघाले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:08 AM2022-12-12T11:08:30+5:302022-12-12T11:08:45+5:30
तक्रारीनंतरही चौकशीत बेजबाबदारपणा दाखविल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर माझी मुलगी वाचली असती, असा आरोप श्रद्धा वालकरचे वडील विकास यांनी पत्रकार परिषद घेऊन केल्यानंतर तपासात आणि चौकशीत बेजबाबदारपणा दाखवत दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे तुळींज आणि माणिकपूर ठाण्यातील तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
श्रद्धाने तक्रार देऊनही त्याची दखल न घेतल्याबद्दल तिच्या वडिलांनी पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीबाबत आदेश काढल्याचे सूत्रांकडून कळते. आफताब माझा गळा दाबून मला ठार करेल, अशी तक्रार श्रद्धाने पोलिस ठाण्यात केली होती. मात्र त्याची वेळीच दखल घेतली गेली नाही. आरोपी आफताब पुनावाला याने मारहाण केल्यानंतर श्रद्धाने तुळींज आणि माणिकपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती; परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. श्रद्धाशी तेव्हाच नीट संवाद साधून तिला बोलते केले असते, आफताबला पोलिस ठाण्यात बोलावून समज दिली असती तरी त्याच्या कृत्याला आळा बसला असता, अशी तिच्या कुटुंबीयांची भावना आहे. हा मुद्दा श्रद्धाचे वडील विकास यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले. तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.
तक्रारच मागे घेतली, तर मग पोलिस दोषी कसे?
n श्रद्धाने जेव्हा तुळींज पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार केली होती. त्यावेळी तिला वैद्यकीय तपासणी करून येण्यास सांगितले; पण ती आलीच नाही. तिला अनेक वेळा तुळींज पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यावर ती आली.
n पण त्यावेळी तिने आफताबबाबत काहीही तक्रार नसल्याचा जवाब पोलिसांना दिला आहे. मूळ तक्रारच मागे घेतल्याने पोलिसांना तपास करता आला नाही. तिच्या वडिलांनी पोलिसांवर केलेल्या आरोपात तथ्य नाही.
n त्यावेळी पोलिसांनी योग्य चौकशी आणि तपास केल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.