Jalgaon: मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा चाळीसगावात खून, तलवारीने केले वार, चारजण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 10:40 PM2024-01-14T22:40:54+5:302024-01-14T22:44:06+5:30
Jalgaon: चाळीसगाव तालुक्यातील ओझरनजीक रविवारी सकाळी झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील वादाचे पर्यवसान खुनात झाले. मुंबई येथे कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा चाळीसगाव शहरात तलवारीचे वार करीत खून करण्यात आला.
- संजय सोनार
जळगाव -चाळीसगाव तालुक्यातील ओझरनजीक रविवारी सकाळी झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील वादाचे पर्यवसान खुनात झाले. मुंबई येथे कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा चाळीसगाव शहरात तलवारीचे वार करीत खून करण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाटणा रोडवर घडली. याप्रकरणी चारजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शुभम अर्जुन आगोणे (वय २८, रा. चाळीसगाव) असे मृत पोलिसाचे नाव आहे. खुनाच्या घटनेने शहर हादरले आहे.चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे रविवारी सकाळी क्रिकेटचे सामने झाले. या सामन्यावेळी एका गटासोबत शुभम आगोणे याचा वाद झाला होता व त्यानंतर रविवारी सायंकाळी हा वाद उफाळून आला. चारजणांनी तलवारीने शुभमवर पाटणारोडवर हल्ला केला. या हल्ल्यात रक्तबंबाळ झाल्यानंतर शुभम आगोणे हा रस्त्यावर पडून होता व नागरिकांना ही माहिती कळताच त्यास चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव निरीक्षक संदीप पाटील व सहकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर चाळीसगाव शहरातील चारजणांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.