'तांडव'विरोधात ठिय्या आंदोलन; आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात
By देवेश फडके | Published: January 19, 2021 03:23 PM2021-01-19T15:23:36+5:302021-01-19T15:25:47+5:30
तांडव या वेबसीरिज विरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार राम कदम यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी उपस्थितांनी सरकारविरोधी घोषणाही दिल्या. या प्रकरणी घाटकोपर येथील चिराग नगर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई :तांडव या वेबसीरिज विरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार राम कदम यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी उपस्थितांनी सरकारविरोधी घोषणाही दिल्या. या प्रकरणी घाटकोपर येथील चिराग नगर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतले आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
तांडव वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात मुंबई पोलीस कारवाई करण्यास तयार आहेत. मात्र, राज्य सरकार त्यांना रोखत आहेत, असा दावा राम कदम यांनी यावेळी केला. महाविकास आघाडी सरकार हिंदू विरोधी आहे. संतांच्या भूमीतच संतांचा अपमान होत आहे, असा आरोप राम कदम यांनी यावेळी केला. तांडव वेबसीरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान झाल्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र, निर्मात्यांविरोधात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे, असे राम कदम यांनी म्हटले आहे.
तांडव वेबसीरिजचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले असून, याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या वेबसीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून, पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, तांडव वेबसीरीज पूर्णपणे काल्पनिक आहे. यामधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असला तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून, कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची कोणत्याही अटीविना माफी मागतो, असे जफर यांनी म्हटले आहे.