Mumbai Police to Raj Thackeray: ...तर मुंबई पोलीस ५ मिनिटांत पोहोचतील; राज ठाकरेंच्या अल्टीमेटमवर थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 07:19 PM2022-04-21T19:19:59+5:302022-04-21T19:22:49+5:30
Raj Thackeray Loud Speaker: मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत.
मशीदींवरील भोंगे ३ मे पर्यंत काढून टाका, नाहीतर आम्ही त्या मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजवू असा इशारा देत राज्यात नव्या वादाला तोंड फोडणाऱ्या मनसे अध्यक्षांना मुंबई पोलिसांनी थेट इशारा दिला आहे.
मुंबई पोलीस कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहेत. फक्त पाच मिनिटांत मुंबई पोलीस कोणत्याही घटनेच्या ठिकाणी पोहोचू शकतात. शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील क्षेत्रे ठरविण्यात आली आहेत. तिथे २४ तास गस्त घालण्यात येत आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दुसरीकडे राज ठाकरे आणि मनसे नेते भोंगा बंदीच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मुंबईतील दसरा मेळाव्यावनंतर पुण्यातील सभेतही राज ठाकरेंनी ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे. तर येत्या १ मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेवरून राजकारण तापलं आहे. मनसेला हवे असलेले मैदान देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे, त्याऐवजी अन्य मैदानांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
Mumbai Police is capable of handling every situation, within 5 minutes the police will reach the location of any incident. Sensitive & vulnerable areas of Mumbai city have been identified. 24 hours patrolling is being done: Mumbai Police on Raj Thackeray's May 3rd ultimatum
— ANI (@ANI) April 21, 2022
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेश राज यांनी दिले. राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. ५ जूनला राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी पोलीस तयार आहेत, असा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यातच आता मुंबई पोलिसांनी ५ मिनिटांत आम्ही पोहोचू, असे म्हटल्याने राज्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.