चिमण्यांच्या संवर्धनासाठी मुंबई सरसावली
By admin | Published: March 20, 2016 02:13 AM2016-03-20T02:13:59+5:302016-03-20T02:13:59+5:30
मुंबई शहर आणि उपनगरातून चिमण्या स्थलांतरित होत असल्याने, त्यांच्या संरक्षणासह संवर्धनासाठी मुंबईकरांनी उल्लेखनीय पावले उचलली आहेत. धारावी येथील ‘स्पॅरोज शेल्टर
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातून चिमण्या स्थलांतरित होत असल्याने, त्यांच्या संरक्षणासह संवर्धनासाठी मुंबईकरांनी उल्लेखनीय पावले उचलली आहेत. धारावी येथील ‘स्पॅरोज शेल्टर’, भांडुप येथील ‘पॉज’ आणि नामांकित संस्थेपैकी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’सारख्या संस्थांनी याकरिता पुढाकार घेतला असून, पक्षिमित्रांनीही याबाबत उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांचा आलेख चढाच असून, चिमण्यांना मुंबईत अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी पक्षिमित्र आणि संस्था आणखी सक्रिय झाल्या आहेत. २० मार्च या ‘जागतिक चिमणी दिना’निमित्त चिमणी संवर्धनाचा घेतलेला खास आढावा ‘लोकमत’च्या वाचकांसाठी.
पाचएक वर्षांपूर्वी मुंबई आणि उपनगरातून चिमण्यांची संख्या कमी होत असल्याची ओरड होऊ लागली. प्रत्यक्षात यावर पक्षिमित्र आणि संस्थांनी केलेल्या संशोधनाअंती चिमण्यांची संख्या कमी होत नाही, तर चिमण्या स्थलांतरित होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. तरीही चिमण्या मुंबईतून स्थलांतरित होऊ नयेत, म्हणून ‘सह्याद्री निसर्गमित्र’, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’, ‘स्पॅरोज शेल्टर’ आणि ‘पॉज’सारख्या संस्था कार्यरत झाल्या. चिमण्यांना वास्तव्य करण्यासाठी लागणारे स्पॅरो शेल्टर असो वा अन्य साहित्य, या माध्यमातून चिमण्यांच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय पावले उचलण्यात आली. प्रथमत: मुंबईतून चिमण्या नष्ट होत नसल्याचे संस्थांच्या माध्यमातून मुंबईकरांना पटवून देण्यात आले. शिवाय चिमण्या स्थलांतरित होत असल्याचे प्रामुख्याने सांगत, संस्थांनी मुंबईकरांमध्ये याबाबत जनजागृती सुरू केली.
केवळ ‘जागतिक चिमणी दिना’पुरतेच मर्यादित न राहता शाळा आणि महाविद्यालयातून स्पर्धांच्या आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाच्या उपक्रमावर जोर दिला. स्पॅरो शेल्टर, राहत्या घरी अथवा कार्यालयाच्या ठिकाणी चिमण्यांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. सलग तीनएक वर्षे याबाबतच्या जनजागृतीवर भर देण्यात आल्याने आता ठिकठिकाणी लावलेल्या स्पॅरो शेल्टरमध्ये चिमण्या वास्तव्य करत असल्याचा निष्कर्ष संस्थांसह पक्षिमित्रांनी काढला आहे.
चिमण्यांना द्या जागा...
- फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी दाणा-पाणी ठेवा.
- घरात काही वस्तूंची (बूट, चप्पल इत्यादी) रिकामी खोकी पडलेली असतात. त्यात चिमण्या आत जातील, असे भोक पाडून ते घराबाहेर खिडकीच्या वर उंच जागेवर टांगले, तर तेथे चिमण्या घरटे करतील.
- शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांपासून त्यांना खाद्य भरवायचे फिडर बनवता येईल.
- चिमणी एका वेळी तीन अंडी घालते. पुढील सहा महिन्यांनंतर पुन्हा तीन अंडी घालते. म्हणजे एक चिमणी प्रतिवर्षी सहा पिल्लांना जन्माला घालते. चिमणीचे वजन साधारणपणे २८ ते ३६ ग्रॅम असते. तिचे आयुष्य फारच अल्प म्हणजे अडीच किंवा तीन वर्षे असते, असे निरीक्षण पक्षिमित्र प्रमोद माने यांनी नोंदवले आहे.
धारावी येथील ‘स्पॅरोज शेल्टर’ या संस्थेनेही चिमण्यांच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. चिमण्यांच्या संवर्धनासाठी संस्थेने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि महापौरांची भेट घेतली. शिवाय त्यांना ‘स्पॅरो शेल्टर’ भेट म्हणून दिले. चिमणी संवर्धनासाठी शाळा आणि महाविद्यालयात उपक्रम राबवले, जनजागृती केली. सांताक्रूझ आणि बोरीवली येथे ‘बर्ड गॅलरी’ उभारली आहे.
पर्यावरणाचे अभ्यासक गिरीश जगताप यांनी सांगितले की, ‘गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहरातील जैन हिल्स, गांधी तीर्थ, जैन फूड पार्क, अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात चिमण्यांचा अधिवास वाढू लागला आहे. यासाठी मागील कित्येक वर्षांपासून येथील हिरवळ टिकवण्यासह चिमण्यांचा अधिवास वाढावा म्हणून प्रयत्न करण्यात येत होते.
औद्योगिक विकास, वाढते शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे पक्ष्यांवर संकट आले आहे. यातून चिमण्याही सुटलेल्या नाहीत. ‘मोबाइल टॉवर्स’चाही पक्ष्यांना फटका बसत आहे. विशेषत: इमारतींची संख्या, पाणथळ जागांवर अतिक्रमणे याबाबत जनजागृती करण्यासाठी पक्षिमित्र कार्यरत आहेत.