कारवाला येतोय, उडवून जातोय! हेल्मेट घाला, नाहीतर चिलखत, महाराष्ट्रात दुचाकी चालविणे म्हणजे...
By हेमंत बावकर | Published: July 8, 2024 03:32 PM2024-07-08T15:32:58+5:302024-07-08T15:34:41+5:30
Mumbai, Pune Accidents: दुचाकी चालविणाऱ्यांच्याही काही अडचणी असतात. प्रत्येकाला कार घेणे परवडत नाही. घटना एकामागोमाग एक घडताहेत, चर्चाही होतायत पण सावध कोण होतोय? मुंबई - पुण्यात घडलेल्या अपघातांची चर्चा होते...
- हेमंत बावकर
गेल्या काही दिवसांपासून झालेले अपघात पाहता महाराष्ट्रात दुचाकी चालविणे म्हणजे पाप झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पुण्यातील 'बिल्डर बाळा'ने उडविलेली माणसे, परवा मुंबईत आज पुन्हा पुण्यात - पिंपरी चिंचवड हद्दीत... ही मालिका अशीच चालू असते. फक्त ती मुंबई, पुण्यात घडली की विषय ऐरणीवर येतो. कारवाला येतोय आणि उडवून जातोय, तुमच्या जिवाची पर्वा कुणाला? हेल्मेट घाला नाहीतर चिलखत, दुचाकी चालविणे हे महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतात धोक्याचे ठरत आहे.
२०२३ चा अहवाल अजून यायचा आहे. परंतु, २०२२ मधील देशातील एकूण अपघातांचा अहवाल याकडेच निर्देश करत आहे. २०२२ मध्ये एकूण झालेल्या अपघाती मृत्यूंपैकी तब्बल ४४ टक्के मृत्यू हे दुचाकीस्वारांचे होते. वर्षाला ही वाढ ८ टक्के होती. एकूण १.६८ लाख अपघाती मृत्यूंपैकी ७५,००० मृत्यू एवढा मोठा आकडा दुचाकीस्वारांचा होता. बहुतांश अपघातांचे प्रमुख कारण, 'दारू पिऊन गाडी चालवणे' हेच होते. कोणीही येतो आणि उडवून जातो अशी गत दुचाकीस्वारांची झाली आहे.
फार लांब नको; काल परवाचेच अपघात घ्या ना. पुण्यात बिल्डर बाळाने दारू पिऊन आपल्या कोट्यवधीच्या कारने एका आयटी कर्मचारी असलेल्या तरुण-तरुणीला उडविले होते. तरुणी तर आकाशात १०-१५ फूट उंच उडून खाली पडली होती. परवा मुंबईत एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या तर्रर्र मुलाने ड्रायव्हरला बाजूला बसायला सांगून कामावर जात असलेल्या कोळी जोडप्याला उडविले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी समाधान कोळी या पोलीस कर्मचाऱ्याला पुण्यातील दापोडीत उडविले गेले.
दारु पिऊन गाडी चालविणे गुन्हा आहे, पण जुमानतो कोण? रात्रीच नाही तर दिवसाही दारू पिऊन गाड्या सर्रास चालविल्या जातात. रात्री तर तेजतर्रार असतात. दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. हेल्मेट घातले काय की चिलखत, या कारवाल्यांना किंवा मोठ्या वाहन चालकांना आवरणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरे तर, रस्त्यावर दुचाकी चालविणाऱ्याला धडक मारणे म्हणजे चिलटाला मारण्यासारखेच झाले आहे. समोरून दुचाकी येत असेल तर ओव्हरटेक करताना त्याला विचारातच घेतले जात नाही. सरळ अंगावर वाहन दाबले जाते. यामुळे अनेकदा दुचाकी कंट्रोल झाली नाही किंवा रस्त्याच्या कडेला उतरवायची झाली तर रस्ता आणि साईडपट्टीच्या उंच-सखलपणामुळे घसरून त्या वाहनाच्या खालीच जाते. ही दुचाकीस्वारांची रस्त्यावरील अस्तित्वाची लढाई अशीच सुरू राहते.
हेल्मेट घातले तर डोके वाचेल...
हेल्मेट घातले तर डोके वाचेल, पण हातापायाचे, छातीचे आणि कंबरेचे काय? हेल्मेटला विरोध नाही, अनेकदा ते मोठ्या दुखापतीपासून वाचवते. पण अंथरुणावर नाहीतर व्हील चेअरवर नुसते पडून राहणाऱ्यांच्या कुटुंबाची परवड किती होते? एकटाच कमावता/कमावती असेल तर पुरती वाताहत. लाडक्या लेकी/बहिणीवर दुसऱ्यांची धुणीभांडी करण्याची वेळ येते. जर घरातील सर्व करणारी 'गृहमंत्री'च जखमी झाली, तर तिच्या नवऱ्याची, मुलाबाळांची परवड होते. काही अपघात सेटल केले जातात, त्यात उपचाराचे पैसेही पुरत नाहीत. आयुष्यभर ते दुखणे घेऊन जगावे लागते.
सगळेच कार घेऊन निघाले तर...
दुचाकी चालविणाऱ्यांच्याही काही अडचणी असतात. प्रत्येकाला कार घेणे परवडत नाही. आपण अनेकदा कारमध्ये मावेल एवढे अख्खे कुटुंब घेऊन दुचाकीवरून पती-पत्नी, दोन मुले, त्यांचे साहित्य घेऊन जाताना पाहतो. कार असती तर सगळे आरामात बसून गेलो असतो, असं त्यालाही वाटत असेलच की. बरं ज्यांच्याकडे कार आहे, त्या सगळ्यांनी दुचाकी तशीच ठेवून कार बाहेर काढली तर? रस्त्यावर मावतील तरी का? मुंबई-पुण्यात पाऊस पडायला लागला की काय अवस्था असते. मोठमोठ्या सात सीटर कारमध्ये एकटाच कोणीतरी असतो. अशा एकट्या एकट्याच्या कारच्या कित्येक लांबपर्यंत रांगा असतात. यामुळे पैसा असलेले लोकही स्कूटर किंवा मोटरसायकवरून येऊ-जाऊ लागतात. पण या सर्वांना या नशेबाज कारचालक आणि मोठ्या वाहनांपासून वाचविणार कोण?
दुचाकीस्वारांच्याही चुका असतात...
दुचाकीस्वारांच्याही चुका असतातच. त्याचं समर्थन करताच येणार नाही. पटकन इकडून तिकडे बाईक वळवणं, साईट पट्टा असूनही रस्त्याच्या मधून चालवणं, हेल्मेट न घालणं, दुचाकीचे आरसे काढून ठेवणं, बेजबाबदार आणि बेदरकारपणे ओव्हरटेकिंग करणं आदी बऱ्याच चुका असतात. या अपघातापासून वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, लहान गाडी असो की मोठी; सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. सरकारने रस्ते नीट केले पाहिजेत. दारुड्यांनी स्वत: नशेत गाडी न चालविता आपल्या घरी जाण्याची सोय केली पाहिजे. पोलिसांनी अधिक कठोर झाले पाहिजे, चालक दारू प्यायलेला आहे की नाही, हे अधिक सोपेपणाने तपासता येणारं यंत्र त्यांच्याकडे असायला हवी. असे समाधान कोळींसारखे किती जीव आपण गमावणार?... आपली जशी घरी कोणीतरी वाट पाहत असते तशी दुसऱ्याचीही वाट पाहणारं कुणीतरी असतं, याचा विचार सर्वांनी करायला हवा. तरच कुठेतरी प्रकारांना आळा बसू शकतो. घटना एकामागोमाग एक घडताहेत, चर्चाही होतायत पण सावध कोण होतोय?, हा खरा प्रश्न आहे.