मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशाला लुटून केली बेदम मारहाण
By Admin | Published: July 8, 2017 12:00 PM2017-07-08T12:00:05+5:302017-07-08T12:00:05+5:30
खासगी वाहतूक सेवा देणा-या वाहनातून प्रवास करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडले आहे.
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 8 - खासगी वाहतूक सेवा देणा-या वाहनातून प्रवास करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला लुटून त्याला गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देहूरोड हद्दीत शुक्रवारी (7 जुलै ) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या या प्रवाशाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वाकडमधून हा प्रवासी खासगी वाहनात बसला. मात्र पुढे जाऊन त्या वाहनातील व्यक्तींनी त्याच्याकडून पैसे, मोबाइल काढून घेतले व त्याला गंभीर मारहाण केली. मारहाण करुन त्याला तेथेच रस्त्यावर सोडण्यात आले.
जखमी अवस्थेतच त्यानं पायपीट करत त्यानं किवळे गाठले. त्यावेळी काही स्थानिकांची त्याची गंभीर अवस्था पाहून त्याला रुग्णालयात दाखल केले.याप्रकरणी देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
आणखी बातम्या वाचा
विमानतळावर नोकरीला लावतो सांगून 10 लाखाला लुटलं
फेब्रुवारी महिन्यात एका व्यक्ती नोकरीचं आमिष देऊन लुटण्यात आल्याची घटना समोर आली होती. नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाला इंडिगो एअरलाईन्स या खासगी कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका मोबाइल धारकाने 10 लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात सायबर भामट्याविरोधात गुन्हा नोदविण्यात आला होता.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मोहमंदद नवाजुउद्दीन मोहमंद नईमुद्दीन(२५,रा.भडकलगेट जवळ)हा तरुण बेरोजगार असून त्याने shine.com या संकेतस्थळावर नोकरीसाठी नोंदणी केली होती. त्यानंतर 16 जानेवारी रोजी त्यांना एका मोबाइलधारकाने फोन करुन तो जॉब एक्स्प्रेसमधून बोलत असल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्यांच्याकडे विविध नोकऱ्या असून त्यांच्या कंपनीकडे नोंदणी करण्यासाठी १६५०रुपये नोंदणी शुल्क भरण्याचे सांगितले.
नवाजुउद्दीनने तात्काळ पेटीएममार्फत आरोपीच्या खात्यात ही रक्कम पाठविली. दुसऱ्या दिवशी एका जणाने फोन करुन तुमची टेलिफोनिक मुलाखत घेणे आहे. शिवाय तुमची पडताळणी करावयाची असल्याने त्यासाठी ५ हजार ७००रुपये शुल्क पाठवण्याचे सांगितले. त्यानंतर त्याची आरोपीने मुलाखत घेतली आणि मुलाखतीत तुम्ही उत्तीर्ण झाल्याचे कळवले. दुसऱ्या दिवशी आरोपीने पुन्हा संपर्क साधला आणि तुम्हाला ऑफर लेटर आणि लेटर मॉडिफि केशन चार्जेसाठी १४ हजार ५००रुपये भरण्याचे सांगितले. ही रक्कम आरोपीस पाठवल्यानंतर १९ रोजी आरोपीनेफोन करुन २१ दिवसाची ट्रेनिंग होणार असून यासाठी २५ हजार ९००रुपये भरावयास लावले. त्यानंतर त्याच दिवशी ई-मेलवर नोकरीचे ऑफर लेटर आरोपीने पाठवले.
त्यानंतर २० जानेवारी रोजी आरोपीने त्यांना तुमचा विमा उतरवायचा असल्याने त्यासाठी ३२ हजार ५००रुपये जमा करण्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तुमचे बँक खाते उघडण्यासाठी २९ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला पोस्टद्वारे नोकरीचे नियुक्तीपत्र घरपोच मिळेल तुम्हाला चिकलठाणा विमानतळावर रूजू व्हायचे आहे. चार दिवसानंतरही नोकरीचे पत्र न मिळाल्याने तक्रारदाराने आरोपीशी संपर्क साधला असता त्याने काही तांत्रिक कारणामुळे तुमचे नियुक्तीपत्र पाठविता आले नाही.तुमची रूजू होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. चार दिवसानंतर आरोपीने फोन करुन विमानतळापासून पाच किलोमीटरच्या आत तुमच्यासाठी निवासस्थान पाहण्यात आले असून यासाठी ४३ हजार रुपये आरोपीने मागितले. यावेळी नवाजुद्दीन यांनी ही रक्कम जमा करण्यासाठी अवधी मागितला. आरोपीने आतापर्यंत आपल्याकडून तब्बल १० लाख ९ हजार ८५०रुपये उकळले तक्रारदारास संशय आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदविली.