मुंबईला पावसाने झोडपले
By admin | Published: June 25, 2016 03:32 AM2016-06-25T03:32:54+5:302016-06-25T03:32:54+5:30
मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले
मुंबई : मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने काही काळ घेतलेली विश्रांती वगळता सायंकाळपर्यंत पडलेल्या मुसळधार सरींमुळे हिंदमाता, परळ टीटी, कुर्ला पश्चिमेकडील कमानी आणि शीतल सिग्नलसह उर्वरित सखल ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. परिणामी रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच जोरदार पावसामुळे हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल १० मिनिटे विलंबाने धावत होत्या.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या तुलनेत मुंबई शहरात विशेषत: दक्षिण मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. मरिन ड्राइव्ह, कुलाबा, फोर्ट, मस्जीद बंदर, भायखळा, वरळी, लालबाग आणि दादर येथे दुपारी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. तर पूर्व उपनगरांतही दुपारी कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, भांडुपसह मुलुंड येथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पश्चिम उपनगरांत अंधेरी, बोरीवलीसह जोगेश्वरी येथेही बरसलेल्या पावसाने मुंबईकरांची धावपळ उडाली. मुंबई शहरात पडलेल्या मुसळधार सरींमुळे हिंदमाता, परळ टीटी येथील सखल भागात पाणी साचले. येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून मॅनहोलची झाकणे उघडण्यात आली होती. शिवाय आवश्यक मनुष्यबळही तैनात करण्यात आले होते. तर कुर्ला पश्चिमेकडील शीतल आणि कमानी सिग्नल या सखल ठिकाणीही पावसाचे पाणी साचले होते. साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर मोहम्मद अली रोड, भायखळा, दादर आणि सायन व लाल बहादूर शास्त्री मार्गावर सायन सर्कल, कुर्ला डेपो, कमानी सिग्नल आणि श्रेयस सिनेमा येथील वाहतुकीचा वेग मंदावला होता.
तलावांमध्ये पाऊस नाहीच; पाणीकपात कायम
गुरुवार रात्रीपासून मुंबईत पावसाने चांगला जोर धरला आहे़ मात्र प्रमुख तलावांच्या क्षेत्राकडे आजही पावसाने पाठ फिरवली आहे़ त्यामुळे तलावांची पातळी खालावत असून राखीव साठ्यावरच पालिकेची मदार आहे़ परिणामी पावसाळ्यातही मुंबईकरांना पाणीकपातीची झळ सहन करावी लागणार आहे़
विलंबाने मुंबईत दाखल झालेल्या पावसाने तलाव क्षेत्रांमध्ये मात्र हजेरी लावलेली नाही़ मुंबईत असलेले विहार व तुळशी तलावांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे़ त्याचवेळी पावसाअभावी भातसा, मोडक सागर, तानसा आणि मध्य वैतरणा कोरडेच आहेत़ तर अपर वैतरणा तलाव पाण्याच्या किमान पातळीपेक्षाही खालावला आहे़ त्यामुळे पाणीसंकट आणखी वाढत चालले आहे़
भातसा, मोडक सागर आणि तानसा या तलावांची याहून वेगळी स्थिती नाही़ त्यामुळे आॅगस्ट महिन्यापासून सुरू असलेली २० टक्के पाणीकपात आणखी काही काळ कायम राहील, असे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले़ तूर्तास राखीव साठ्यामुळे जुलै महिना सरेल, असा पालिकेचा दावा आहे़ (प्रतिनिधी)
झाडे पडण्याच्या तक्रारी शहरात ४, पूर्व उपनगरांत ५
आणि पश्चिम उपनगरांत १० अशा
एकूण १९ ठिकाणी झाडे पडली.
शॉर्टसर्किट : शहरात ५, पूर्व उपनगरांत १ अशा एकूण ६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.
वाहतूक खोळंबली हिंदमाता येथे पाणी साचल्याने काही कालावधीकरिता येथील वाहतूक फ्लायओव्हरवरून वळवण्यात आली होती. ही वाहतूक सायंकाळी ४.३० वाजता पूर्ववत करण्यात आली.
भिंती पडल्या
पूर्व उपनगरांत २, पश्चिम उपनगरांत १ अशा एकूण ३ ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.
हवामान अंदाज कुलाबा वेधशाळेने येत्या २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत अधूनमधून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविला आहे.
पाणीसंकट कायम भातसा, मोडक सागर, तानसा आणि मध्य वैतरणा कोरडेच आहेत़, तर अपर वैतरणा तलाव पाण्याच्या किमान पातळीपेक्षाही खालावला आहे़ त्यामुळे पाणीसंकट आणखी वाढत चालले आहे़
दोन्ही परिचारिकांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यापैकी एका परिचारिकेच्या हाताला लागले आहे. दोघींवरही तत्काळ रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. प्रकृती गंभीर नसल्यामुळे वॉर्डमध्येच त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. परिचारिकांच्या कार्यालयातील प्लॅस्टर पडलेला असून, स्लॅब कोसळलेला नाही.
- डॉ. अविनाश सुपे,
अधिष्ठाता, केईएम रुग्णालय