मुंबईला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:57 AM2017-07-18T01:57:02+5:302017-07-18T01:57:02+5:30
रविवारी सुटी घेतलेल्या पावसाने सोमवारी मात्र रौद्ररूप धारण केले आणि मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, नवी मुंबई, रायगडला सकाळपासून रात्रीपर्यंत जोरदार झोडपून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रविवारी सुटी घेतलेल्या पावसाने सोमवारी मात्र रौद्ररूप धारण केले आणि मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, नवी मुंबई, रायगडला सकाळपासून रात्रीपर्यंत जोरदार झोडपून काढले. मुंबईत प्रामुख्याने कुलाबा, घाटकोपर आणि गोरेगाव येथे मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसाने दिवसभर आपला मारा कायम ठेवला होता. त्यामुळे पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि लालबहादूर शास्त्री मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
सोमवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईवर सरींचा वर्षाव सुरू केला. कुलाबा, घाटकोपर आणि गोरगाव परिसरात सकाळच्या पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळनंतर दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर मात्र सायंकाळी पुन्हा रौद्ररूप धारण केलेल्या जलधारांनी भांडुप, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, लालबाग, भायखळा, फोर्टसह कुलाबा, मरिन ड्राइव्ह, महालक्ष्मी, वरळी, लोअर परळ, माहीम, वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगावला झोडपून काढले.
पावसामुळे शहरात तीन, पश्चिम उपनगरांत दोन अशा एकूण पाच ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात नऊ, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात सात अशी एकूण अठरा ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही.
दरम्यान, पावसाचा वेग कायम राहणार असून, येत्या ४८ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
हवामानाचा अंदाज
१८ जुलै : कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
१९-२० जुलै : संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
२१ जुलै : कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता
मान्सून अपडेट
मान्सून सोमवारी पश्चिम राजस्थानच्या आणखी काही भागात, पूर्व राजस्थानच्या उर्वरित भागात, हरियाणाच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली.