Mumbai Rains, Local: मुंबई लोकल सेवेला मुसळधार पावसाचा फटका; ट्रेन्स ५-१० मिनिटे उशिराने, रस्ते वाहतुकही मंदावली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 09:17 AM2022-07-05T09:17:07+5:302022-07-05T09:17:52+5:30
- पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडण्याचा हवामान विभागाचा नागरिकांना सल्ला - मुंबईत आज ४ वाजता हाय टाईड - कोकणासह अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट
Mumbai Rains, Local: महाराष्ट्रातील मुंबईसह उपनगर आणि कोकण विभागात कालपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल रात्री काही काळ पावसाने उसंत घेतली होती. पण आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. त्याचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेलाही पावसाचा फटका बसला आहे. लोकल सेवा उद्याप सुरू आहे ही प्रवाशांसाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पाच-१० मिनिटे उशिराने सुरू आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावरील ट्रेन्स १० मिनिटाच्या विलंबाने धावत आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने सर्वच नागरिकांना आपल्या कामासाठी घरातून बाहेर निघताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर, मुंबई आणि महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभाग या पावसाळी परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
लोकल सेवेवर परिणाम; रस्ते वाहतूकही मंदावली
आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे हार्बर लाईन आणि मध्य रेल्वे मार्गावरील सर्व ट्रेन्स सुमारे ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सुमारे १० मिनिटे उशिराने धावत आहे. ताज्या माहितीनुसार, सध्या लोकल सेवा अद्याप सुरू आहे ही दिलासा देणारी बाब आहे, पण हवामान विभागाने आजही दिवसभर मुंबईत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे दिवसभर पाऊस पडल्यास रेल्वे सेवा बंद होण्याचीही शक्यता आहे. आज ४ वाजता हाय टाईटची परिस्थिती आहे. त्यावेळी जर मुसळधार पाऊस बरसला तर कुर्ला, माटुंगा, सायन, ठाणे यांसारख्या स्टेशनवर ट्रॅकवर पाणी भरण्याची शक्यता आहे.
पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडण्याचा हवामान विभागाचा नागरिकांना सल्ला
रस्ते वाहतुकीबाबत बोलायचे झाल्यास कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, अशा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वडाळा, अंधेरी सबवे, सायन गांधी मार्केट, दादर हिंदमाता यासह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गरज असल्यासच घराबाहेर पडा असा सल्लादेखील मुंबई आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.
राज्यातील पावसाची स्थिती-
मुंबई आणि कोकणासोबतच कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाळा. पण जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूरसह आसपासच्या परिसरात पावसाचा जोर चांगलाच दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. NDRF च्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात ६ आणि ७ जुलै रोजी तर कोकण आणि गोव्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवल्याने कोकणाला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.