Devendra Fadnavis: मोठी बातमी! NCBनं ज्याला सोडले त्याचे राष्ट्रवादीशी धागेदोरे; फडणवीसांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 11:32 PM2021-10-09T23:32:50+5:302021-10-09T23:33:27+5:30
Devendra Fadnavis On NCB Mumbai Drug Case: मुंबईतील समुद्रात क्रूझ पार्टीवरील एनसीबीनं केलेल्या कारवाईबाबत राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Devendra Fadnavis On NCB Mumbai Drug Case: मुंबईतील समुद्रात क्रूझ पार्टीवरील एनसीबीनं केलेल्या कारवाईबाबत राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एनसीबीनं जी कारवाई केली, यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आली. तर काही लोकांना सोडून देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या व्यक्तीलाही सोडून देण्यात आलं. मात्र त्याचा याप्रकरणात कोणताही समावेश नव्हता, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नागपूरात बोलत होते.
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानं या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं. फडणवीसांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे त्यांना नेमकं कोणत्या नेत्याचं नाव घ्यायचं होतं याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
"एनसीबीनं क्रूझवर केलेल्या कारवाईत अनेकांना पकडण्यात आलं होतं. यात जे लोक क्लीन होते. त्यांचा कशातच सहभाग नव्हता अशा लोकांना सोडून देण्यात आलं. ज्या लोकांकडे काही सापडलं होतं. त्यांनाच एनसीबीनं पकडलं. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे आणि याविरोधात जी संस्था काम करतेय त्या संस्थेच्या पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे. पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. खरंतर ज्या लोकांना सोडलं. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस देखील होता. तो क्लान असल्यामुळे मी त्याचं नाव घेत नाही. त्याचा सहभाग नसल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणं अयोग्य आहे", असं फडणवीस म्हणाले.
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना नवाब मलिक यांचं दुखणंच वेगळं आहे. त्याविषयी मी याआधीही बोललो आहे. आता पुन्हा त्यावर बोलून काही उपयोग नाही, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली.
एनसीबीनं आरोप फेटाळले
नवाब मलिक यांनी एनसीबीवर केलेले आरोप खोटे आहेत. क्रूजवर २ ऑक्टोबरला टाकलेला छापा आणि कारवाई ही कायदेशीर नियमांनुसारच होती. छाप्यादरम्यान १४ जणांना कलम ६७ च्या नोटिशीनुसार ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर पुराव्याच्या आधारे त्यातील आठ जणांना अटक केली होती, तर इतरांना पुराव्याअभावी सोडण्यात आले होते. एनसीबीने एकही नियम मोडलेला नाही. गुप्त माहितीच्या आधारे ती कारवाई करण्यात आली. भाजप नेत्यांना सोडल्याचा आरोप खोटा आहे, असा खुलासा एनसीबीचे एडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केला.
नवाब मलिकांनी कोणता आरोप केला?
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये भाजपाचे नेते मोहित कम्बोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवालासुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एनसीबीने ११ जणांना क्रूझवरुन ताब्यात घेतल्यानंतर तीन जणांना भाजपा नेत्यांच्या आदेशाने सोडून देण्यात आल्याचा बेछूट आरोप केला. मात्र, या आरोपांवर स्पष्टीकरण देताना एनसीबीने हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे.