मुंबईत पुन्हा बरसल्या सरींवर सरी!

By admin | Published: June 29, 2017 02:12 AM2017-06-29T02:12:43+5:302017-06-29T02:12:43+5:30

मुंबईसह आसपासच्या परिसरात मान्सून अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. मंगळवारप्रमाणेच बुधवारीही पुन्हा सरींवर सरी बरसल्यामुळे

Mumbai resorts again! | मुंबईत पुन्हा बरसल्या सरींवर सरी!

मुंबईत पुन्हा बरसल्या सरींवर सरी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह आसपासच्या परिसरात मान्सून अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. मंगळवारप्रमाणेच बुधवारीही पुन्हा सरींवर सरी बरसल्यामुळे मुंबईतील लाईफलाईन समजली जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली. लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या. तर रस्ते वाहतूकही धीम्या गतीने सुरू होती. पावसामुळे शीतल सिनेमागृहाच्या इमारतीचा भाग कोसळला तसेच शहरात अनेक ठिकाणी बांधकामाची पडझड झाली. त्यामुळे मुंबईकरांचे ‘मेघा’हाल झाले.
मुंबईच्या पूर्व उपनगरात पवई, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार आणि कुर्ला परिसरात बुधवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, गोरेगावसह लगतच्या परिसरात पावसाचा जोर कायम होता. मुंबई शहरातही सकाळी गिरगाव, वरळी, दादरसह माहीम आणि वांद्रे-कुर्ला संकुलात पावसाने जोरदार हजेरी लावली. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पावसाच्या तडाख्यामुळे अनुक्रमे लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि कुर्ला-अंधेरी रोडवरील वाहतूक धीम्या गतीने सुरूहोती. शहरात पडलेल्या पावसाचा फटका कमी अधिक प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडला बसला. या रोडवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती तर सायन आणि माटुंगा येथे काही अंशी वाहतूककोंडी झाली होती.
बुधवारी सकाळपासून बरसणाऱ्या पावसाने दुपारच्या सुमारास काहीशी विश्रांती घेतली; परंतु सायंकाळी पुन्हा दक्षिण मुंबईतील फोर्ट, लालबाग, वरळी, दादरसह लगतच्या परिसराला मुसळधार सरींनी झोडपल्याचे चित्र पहायला मिळाले.
पुढील ४८ जास जोर‘धार’
अंधेरी येथील मरोळमधल्या इको पार्क सोसायटीची २० फूट लांबीची संरक्षक भिंत पडली. शहरात ६, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण १२ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर शहरात २६, पूर्व उपनगरात २७ आणि पश्चिम उपनगरात ४२ अशा एकूण ९५ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून, येत्या ४८ तासांत मुंबईत पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.
‘लोकल’ कल्लोळ
मानखुर्द स्थानकाजवळ रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने मानखुर्द-सीएसएमटी हार्बर वाहतूक सकाळच्या सुमारास ठप्प झाली होती. तर रात्री सातच्या सुमारास एलफिस्टन रोड जवळ स्पार्क झाला. त्यामुळे पश्चिम रेल्वेने घरी परतणाऱ्या प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागला.
मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर लोकल उशीरा धावत असल्याचे उद्घोषणा सुरु होत्या. मात्र रोज ‘मरे’ त्याला कोण रडे, अशी अवस्था प्रवाशांची झाली होती. मध्य आणि हार्बर मार्गाप्रमाणे पश्चिम मार्गावर देखील लोकल सेवेत बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. त्यातच शहरातील रस्ते देखील जलमय झाल्याने रस्ते आणि लोकल अशी दुहेरी वाहतूकीची कोंडी झाली होती.
आसनगाव (मध्य रेल्वे)
आसनगाव स्थानकाजवळ ११.२२ मिनिटांनी मालगाडीच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसारा येथे जाणारी वाहतूक कोलमडली. मालगाडीच्या बिघाडामुळे १२.२४ ची कसारा-सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली होती. काही तासांनतर कसारा मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत झाली मात्र वेळापत्रक सुरळीत होण्यास वेळ लागला.
मानखुर्द (हार्बर रेल्वे)
मानखुर्द-गोवंडी स्थानकादरम्यान रेल्व रुळाखालील माती वाहून गेल्यामुळे सकाळी ८.२० ते ८.५५ पर्यंत सीएसएसटीकडे जाणारी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प होती. सकाळी नऊच्या सुमारास मरेच्या दुरुस्ती विभागाने युद्धपातळीवर काम केले आणि लोकल सेवा पूर्ववत केली.
महालक्ष्मी-लोअर परेल (पश्चिम रेल्वे)
रात्री आठच्या सुमारास महालक्ष्मी आणि लोअर परेल स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरवर झाडांची फांदी पडल्याची घटना घडली. यासंबंधी माहिती मिळताच परेवरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत फांदी दूर करत सेवा पूर्ववत सुरू केली.
एलफिन्स्टन रोड
(पश्चिम रेल्वे)
बुधवारी रात्री साडेसातच्या एलफिन्स्टन स्थानकात डाऊन धीम्या लोकलमध्ये १० मिनिटांत तीन स्पार्क झाले. ही घटना घडली तेव्हा गाडी प्रवाशांनी पूर्णपणे भरली होती. त्यामुळे प्रवाशांनी ट्रेनमधून स्थानकावर उड्या घेतल्या. परिणामी स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्थानकांवरील गर्दी आणि संततधार अशा परिस्थितीत सव्वा आठच्या सुमारास पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
दादर (मध्य रेल्वे )
‘पिक अवर’मध्ये दादर स्थानकातील लोकलच्या छतावरुन प्रवास करताना ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला. दादर स्थानकात दुपारी ३.३१ मिनिटांची डोंबिवलीला जाणारी धीमी लोकल होती. या लोकलच्या छतावरुन एक तरुण प्रवास करत होता. तब्बल २५ हजार व्होल्ट विद्युतप्रवाह असलेल्या ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यामुळे तो तरुण रेल्वे रुळावर फेकला गेला. रेल्वे पोलिसांनी जखमी तरुणाला तातडीने रुळावरुन बाहेर काढले. मात्र या अपघातामुळे दादर स्थानकात एका मागोमाग लोकलची लांबच लांब रांग लागली होती.
अनेक ठिकाणी पडझड
कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळा येथे पावसाची अनुक्रमे ६६.८, ३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, पावसामुळे होणारी पडझड सुरूच आहे. शहरात १, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ७ ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. तर कुर्ला पश्चिमेकडील शीतल सिनेमागृहाच्या इमारतीचा काही भाग कोसळला. सुरक्षेच्या कारणात्सव पोलिसांच्या मदतीने सिनेमागृह प्रशासनाने सिनेमाचा शो बंद करून सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. ही इमारत खासगी असून, ती रिकामी करण्यात आली आहे. शिवाय महापालिकेमार्फत इमारतीला नोटीसही बजावण्यात आली आहे.

Web Title: Mumbai resorts again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.