‘मुंबई स्कूल टीम’चे दिमाखदार जेतेपद
By admin | Published: June 29, 2016 01:51 AM2016-06-29T01:51:11+5:302016-06-29T01:51:11+5:30
यूएसए ‘वेक्स वर्ल्ड रोबोटिक्स २०१६’ स्पर्धेत जगातील नामांकित संघांना धूळ चारत, मुंबई स्कूल संघाने दिमाखदार अजिंक्यपद पटकावले.
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या यूएसए ‘वेक्स वर्ल्ड रोबोटिक्स २०१६’ स्पर्धेत जगातील नामांकित संघांना धूळ चारत, मुंबई स्कूल संघाने दिमाखदार अजिंक्यपद पटकावले. मुंबईतील अर्णव अग्रवाल (१०), कशन दमानी (१०), आदित लखानी (११) आणि माहिर शहा (११) यांनी या जागतिक रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत अव्वल क्रमांक पटकावला. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येदेखील ‘सर्वांत मोठी रोबोटिक्स स्पर्धा’ अशी या स्पर्धेची नोंद करण्यात आली आहे.
रोबोटिक्स स्पर्धेचे आयोजन अमेरिकेत लुईसविले, केंचुकी येथे करण्यात आले होते. जागातिक स्पर्धेत ३० राष्ट्रांमधील तब्बल ११०० संघ सहभागी झाले. त्यात सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्व टिम्सना जगभरातील गेम बेस इंजिनीअरिंग आव्हानांमध्ये इतर टीम्सशी स्पर्धा करण्यासाठी रोबोट डिझाइन तयार करण्याचे आव्हान देण्यात आले होते.
मुंबई संघाच्या चमूंनी शिस्तबद्ध पद्धतीने कामाचे नियमन करून ते आव्हान स्वीकारले आणि वेळेत पूर्ण केले. तीन दिवसांच्या चाचणीनंतर मुंबईकरांनी सातासुमद्रापार अजिंक्यपद मिळवत दिमाखात तिरंगा फडकावला. तत्पूर्वी मुंबईकरांना यूएसए, कॅनडा, चीन, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, हाँगकाँग, मलेशिया, इथिओपिया, पेरुग्वे, मेक्सिको आणि प्युर्टो रिकोसारख्या देशांनी कडवी झुंज दिली. देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच भारताने वेक्स वल्डर््स रोबोटिक्स स्पर्धेत पारितोषिक मिळवले आहे. मुंबई संघाला आशा सुंदराजन यांनी प्रशिक्षण दिले होते. (प्रतिनिधी)