मुंबईत कोसळल्या सरींवर सरी
By admin | Published: August 2, 2016 05:58 AM2016-08-02T05:58:34+5:302016-08-02T05:58:34+5:30
मुंबई शहरासह उपनगरात पडणाऱ्या पावसाने सलग चौथ्या दिवशीही आपला वेगवान मारा कायम ठेवला.
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात पडणाऱ्या पावसाने सलग चौथ्या दिवशीही आपला वेगवान मारा कायम ठेवला. शुक्रवार, शनिवार आणि रविवारच्या तुलनेत सोमवारी कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत शहरात १८ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ३१ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात २३ मिलीमीटर पाऊस पडला.
सोमवारी सकाळी मुंबई शहरात कुलाबा, मरिन ड्राइव्ह, फोर्ट, भायखळा, लालबाग, लोअर परेल, वरळी, प्रभादेवी आणि माहीममध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी मात्र येथे पावसाने काही काळ विश्रांती घेतली. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही सकाळी कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, विद्याविहार, घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, विक्रोळी, भांडुप, अंधेरी, बोरीवली, मालाड, पवई व गोरेगावमध्येही थांबून-थांबून जोरदार हजेरी लावली. दुपारी १२दरम्यान उपनगरात विश्रांती घेतलेल्या पावसाने २नंतर पुन्हा मारा केला. सायंकाळी ५नंतर पडलेल्या टपोऱ्या थेंबांनी मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले. मागील चोवीस तासांत कोसळलेल्या पावसामुळे पूर्व उपनगरात ९, पश्चिम उपनगरात १५ अशा एकूण २४ ठिकाणी पाणी साचले. (प्रतिनिधी)